संतोष मासोळे

काही वर्षांपूर्वी बहुचर्चित पांझरा चौपाटी अनधिकृत ठरवून हटविल्यानंतर विरोधकांनी आता माजी आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीकाठावर साकारलेल्या रस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. महापुरामुळे नदीकाठलगतच्या परिसरात नुकसान झाले. त्याची कारणे शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणीदेखील करण्यात आली. महापालिका निवडणुकीत भाजपशी गोटे यांचे बिनसले. आमदारकीचा राजीनामा देणारे गोटे पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरतील, हे लक्षात घेऊन विरोधकांनी त्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कोंडी करण्याचे धोरण आखले. महापूर, त्यामुळे झालेले नुकसान राजकीय पटलावर परस्परांवर कुरघोडी करण्याचा विषय ठरला आहे.

शहरातील पांझरातिरी तयार झालेल्या प्रत्येकी पाच किलोमीटर रस्त्यांचे काम आणि नदीपात्रात उभारलेली मूर्ती तसेच झुलत्या पुलाचे सुरू असलेले काम हे सारेच महापुरामुळे चर्चेत आले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने रस्त्यांचे काही ठिकाणी नुकसान झाले. या कामांमुळेच पांझरेचे पात्र कमी झाले आणि नदीकाठच्या वसाहतींना महापुराचा फटका बसला, असा आरोप  होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो कळीचा मुद्दा होणार आहे. पांझरा काठावरील रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी सुटेल आणि मुंबई-आग्रा तसेच नागपूर-सूरत महामार्गावर ये-जा करण्यासाठी हे रस्ते महत्त्वाचे ठरणार असल्याचे दावे केले गेले होते. नदीकाठावरील रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. शिवाय काठालगतची दलदल कमी झाल्याची स्थानिकांची भावना आहे. या कामांसाठी भाजप सरकारने कोटय़वधीचा निधी मंजूर केला आहे. धुळे शहरातील आजवरचा इतिहास पाहता गोटे यांच्या एकाही प्रकल्पाचे काम विरोधाशिवाय झालेले नाही. पांझरातिरावरील नव्या रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या पथदिव्यांसाठी महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देत नाही, असे गोटे यांचे म्हणणे आहे. या घटनाक्रमात महापुराने नवा अध्याय जोडला गेला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पांझरातिरी दुतर्फा तयार झालेल्या रस्त्याच्या कामांवरही कुऱ्हाड घालण्याचा आटापिटा विरोधकांनी चालविला आहे. या कामांमुळे नदीपात्र कमी झाले. पुराच्या पाण्याने अक्राळविक्राळ रूप घेतले. यामुळे नदीकाठच्या कुटुंबांना पुराचा फटका बसला, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या वादात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी उडी घेतली. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची नेमकी कारणे काय, याचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत.

यापूर्वी गोटे यांच्या संकल्पनेतून साकारलेली पांझरा काठावरील चौपाटी अनधिकृत ठरवून उठविण्यात आली. चौपाटीच्या ठिकाणी १०० दुकाने थाटली गेली होती. न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात चौपाटी हटविण्यात आली. पांझरा काठावरील रस्त्यांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले. परंतु, गोटेंनी भाजपविरोधात भूमिका घेतल्यानंतर रस्त्याच्या प्रकल्पाला भाजपची सत्ता असणारी महापालिका ना-हरकत प्रमाणपत्रही देत नाही. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुभाष भामरे यांच्याकडून रस्ते कामावर अप्रत्यक्ष आक्षेप घेणे धुळेकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बुधवारी धुळ्यात येत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच त्यांना भाजपमधील अनेकांचा विरोध आहे.

आपल्याला या वादात पडायचे नाही. पूरग्रस्तांचे दीर्घकालीन पुनर्वसन करण्यासाठी आपला प्रयत्न आहे.

– खा. डॉ. सुभाष भामरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री

रस्ते करताना नदीपात्र पूर्वीच्या १४० मीटरपेक्षा अधिक म्हणजे १८० मीटर एवढे विस्तीर्ण केले आहे. पुराच्या पाण्याची उंची जवळपास तीस फूट इतकी गृहीत धरली आहे. असे असताना पूर आल्यावर या कामांमुळे नुकसान झाले असे कसे म्हणता येईल?

– अनिल गोटे, माजी आमदार