धारुरमध्ये मेघगर्जनेसह वादळाचा तडाखा

बीड : जिल्ह्य़ाच्या काही भागांत रविवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. धारूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता.

धारूर तालुक्यातील सोनीमोहा, जहांगीर मोहा, पहाडी पारगाव, चोरंबा, अरनवाडी येथे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाने नद्या, नाले तुडुंब वाहू लागले. पहाडी पारगाव येथील लेंढी नदीला पूर आला होता. सोनीमोहा, चोरंबा, अरनवाडी येथील नद्यांनाही पूर आल्याने दोन्ही काठ ओसंडून वाहत होते. पुराच्या पाण्यात एक प्रवाशी मोटार अडकली तर बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली. धारुर शहरातही जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते. वादळामुळे कोविड केंद्राच्या रस्त्यावरील विद्युत रोहित्र कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तर वीज पुरवठाही खंडित झाला होता. भर उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. वादळामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरावरील पत्रेही उडाले. अवकाळीमुळे आंब्यासह केळीच्या बागांचेही नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारीच धारूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. आवरगाव, पांगरी, तांदूळवाडी, हसनाबाद व परिसरात चक्रीवादळासह  पावसाचा तडाखा बसल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. फळबागेचे सुद्धा नुकसान झाले होते. अमोल जगताप यांचा केळीच्या बागेतील झाडे उन्मळून पडली. त्यातच रविवारीदेखील जोरदार पाऊस झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून तातडीने भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.

लातूूरमध्ये दोघांचा मृत्यू

लातूरमधील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, तगरखेडा, सावली, शेळगी, कलमुगळी, ताडमुगळी, माळेगांव आदी गावाला रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. यात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तगरखेडा येथील गोराबा रामा सूर्यवंशी (वय ६५) तर सुभाष किसन देशमुख (वय ३५) अशी वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सुभाष देशमुख हे औराद शहाजनी येथील रहिवासी होते. मृत गोराबा सूर्यवंशी हे शेतात शेळ्या चारत असताना त्यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या पावसाने १९ जनावरे दगावली होती. इतर काही भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने अनेक गावांत घरावरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

वीज पडून महिलेचा मृत्यू

नांदेड : अवकाळी पावसादरम्यान वीज पडून शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर तीन जखमी झाले. मुगट येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. मृत महिलेचे नाव लक्ष्मी बालाजी वर्षवाड (३०) आहे. तर रेणुका व्यंकटी वर्षवाड (३०), इंदुबाई जयराम लोखंडे (५५) व अर्चना दिलीप मेटकर (२२) अशी जखमींची नावे आहेत. मृत लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तर, जखमी महिलांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठवाडय़ाच्या विविध भागात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी, मजूर वर्ग शेतात काम करत असून गडगडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळ्याच्या घटनाही घडत आहेत.