भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान ‘रो-रो’ सेवा दृष्टिक्षेपात आली आहे. दोन दिवसांत यासाठी लागणारी बोट मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे जवळपास दोन वर्षे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मांडवा बंदरातील गाळ उपसण्याचे काम वेगाने सुरू असून, आठवडाभरात ही सेवा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘सागरमाला प्रकल्पां’तर्गत मुंबई महानगराला जोडणाऱ्या सागरी मार्गावर ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान ‘रोल ऑन-रोल ऑफ’ जल वाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी १२५ कोटी रुपये खर्चून मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल, जेटी आणि ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे. तर भाऊचा धक्का येथेही सुसज्ज टर्मिनल उभारण्यात आले आहे. ही सेवा एप्रिल २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र २०२० फेब्रुवारी महिना उजाडत आला तरी ‘रो-रो’ सेवा सुरू होऊ शकलेली नाही. आता जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रीसवरून ‘प्रोटोपोरस’ नामक बोट मुंबईत दाखल होणार आहे.  तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान १७ फेब्रुवारीपासून ‘रो-रो’ सेवा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

भाऊचा धक्का आणि मांडवा येथील टर्मिनल्स तयार आहेत. मात्र बोट उपलब्ध नसल्याने ही सेवा कार्यान्वित झाली नव्हती. आता बोट दाखल होत असल्याने लवकरच ही सेवा कार्यान्वित केली जाईल. १७ फेब्रुवारीला ही सेवा कार्यान्वित करण्याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही.

– आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड</p>