वर्षभरात २९३ अपघात; ३१७ जणांचा मृत्यू ; मागील वर्षीच्या तुलनेत १२५ ने घट

कल्पेश भोईर , लोकसत्ता

वसई : मद्यपान करून, तसेच अतिवेगाने वाहन चालविणे  यामुळे पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात.  परंतु यावर्षी करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे रस्ते अपघातांत घट झाली आहे. सन २०२० मध्ये २९३ अपघाताच्या घटना घडल्या असून त्यामध्ये ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यूचे प्रमाण हे १२५ ने घटले आहे.

पालघर जिल्ह्यासह वसई-विरार शहरात  वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक विभागातर्फे कारवाई केली जाते. परंतु बेदरकारपणे वाहने चालविणे, नियमांचे उल्लंघन, दारू पिवून वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, अशा विविध कारणांमुळे अपघात होत असतात. या अपघातात काही गंभीर स्वरूपाचे देखील अपघात असतात यामुळे अनेकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.  मध्यंतरी अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्वच वाहतूक ठप्प होती. यामुळे रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. तर मृतांची संख्याही कमालीची घटली आहे. मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची संख्या कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सन २०१९ मध्ये ४०९ गंभीर अपघात झाले होते यात ४४२ जणांचा मृत्यू झाला होता. तर सन २०२० या वर्षांत २९३ अपघात झाले असून यामध्ये ३१७ जणांचा मृत्यू झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत अपघात व मृत्यू या दोन्हीमध्ये घट झाली आहे. अपघाताचे प्रमाण ११६ ने तर मृतांची संख्या ही १२५ ने घटली आहे. म्हणजेच ३० टक्कय़ांनी हे प्रमाण कमी झाले आहे.असे अपघात रोखण्यासाठी यानंतर अजून कारवाई तीव्र करून बेशिस्त वाहनचालकांना व मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला जाईल अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

मृतांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून व बेशिस्तपणे वाहने चालविल्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता मीरा-भाईंदर व वसई-विरार असे पोलीस आयुक्तालय नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे शहरात होणारे अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यामुळे कारवाईच्या विशेष मोहिमा, जनजागृती असे सर्व उपक्रम राबवून सन २०२० मध्ये जे अपघात घडले आहेत. परंतु येणाऱ्या काळात त्याहीपेक्षा  २० टक्कय़ांहून अधिक अपघाताचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपआयुक्त संजय पाटील यांनी सांगितले आहे. वाहनचालकांनी ही आपली जबाबदारी ओळखून  सुरक्षितपणे वाहने चालविली पाहिजे असेही पाटील यांनी सांगितले.

मागील पाच वर्षांतील अपघात आकडेवारी

वर्ष     गंभीर अपघात    मृत्यू

२०१६         ३४९            ३७०

२०१७         ४४९            ४८७

२०१८         ४७१           ५०५

२०१९         ४०९           ४४२

२०२०         २९३           ३१७