एरव्ही शांत असणारी रविवारची सकाळ इचलकरंजीत आंदोलनाची झुल पांघरून उगवली. कारण ठरले आधारकार्ड देण्याचे मान्य करूनही महा ई सेवा केंद्र सुरू न झाल्याने संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांसह रस्त्यावरच ठाण मांडले. अचानकपणे झालेल्या या आंदोलनाने सर्वाचीच तारांबळ उडाली. गावचावडीसमोरच पालकांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला होता. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलनकर्त्यां नागरिकांना घरचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय उरला नाही.
विविध शासकीय योजनांचे अनुदान आता थेट बँक खात्यावरच जमा केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे व त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड व बँक पासबुक अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याबरोबरच आधारकार्ड आणि बँक पासबुक काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. गावचावडी परिसरातील एका महा ई सेवा केंद्रावर तर दोन दिवसांपासून नागरिकांची झुंबड उडाली आहे. पाच वर्षांवरील पाल्यांचे आधारकार्ड आवश्यक असल्याने पहाटेपासूनच नागरिक मुलाबाळांसह महा ई सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत. तर वयोवृद्धांनाही त्रास सोसावा लागत आहे.
चावडीनजीक असलेल्या पाटील नामक ई सेवा केंद्र चालकाने रविवारी या आधारकार्ड काढून देतात असे नागरिकांना सांगितले होते. त्यानुसार पहाटे पाच वाजल्यापासून अनेक महिला चिमुकल्यांसह महा ई सेवा केंद्रासमोर जमल्या होत्या. सुमारे पाच तास हे सर्व जण रांगेत उभारून केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत होते. पण साडेदहा वाजून गेले तरी केंद्र उघडत नसल्याचे पाहून अनेकांना संतापाचा पार चढू लागला होता. भरीत भर म्हणून या केंद्राच्या ठिकाणी आधारकार्ड ऑनर्लान सव्‍‌र्हिस बंद असल्याने रविवारी कामकाज बंद राहील असा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे संतापात भरच पडली आणि संतप्त नागरिकांनी आपल्या पाल्यांसह गावचावडीसमोरील रस्त्यावर ठाण मांडून रस्ताच अडवून टाकला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. आंदोलनाची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्यातील सपोनि प्रज्ञा देशमुख त्या ठिकाणी आल्या असता महिलांनी त्यांना गराडा घालून प्रश्न आणि गाऱ्हाणी मांडण्यास सुरुवात केली. अखेरीस या आंदोलकांची समजूत काढून त्यांना रस्त्यावरून बाजूला नेण्यात आले.