पलूस तालुक्यात नसर्गिक आपत्तीअंतर्गत १२ कोटी २० लाखाचा रस्ते विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी नुकतीच दिली. पलूस पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या आमसभेत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम बोलत होते.  या आमसभेस पंचायत समितीच्या सभापती यास्मीन पिरजादे, सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार, प्रांताधिकारी दादा कांबळे, महेंद्रअप्पा लाड यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पलूस तालुका राज्यातील एक आदर्श तालुका म्हणून विकसित करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, पलूस तालुक्यात आतापर्यंत जवळपास १२० कोटी रुपयांची विकास कामे हाती घेतली असून येथील जनतेला आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील जनतेचे प्रश्न आणि समस्यांच्या सोडवणुकीस प्रशासकीय अधिका-यांनी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेशही पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले. तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन प्रश्नांची गावातच सोडवणूक करण्याच्या दृष्टीने गावभेटीचा कार्यक्रम प्रशासकीय अधिका-यांनी राबवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
पलूस तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे लोकांची होणारी गरसोय टाळण्यासाठी रस्ते आणि पुलांच्या उभारणीचा भरीव कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, पूल आणि रस्ते विकासाच्या कार्यक्रमातून तालुक्यात १२ कोटी २० लाखाचा रस्ते विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच पलूस तालुक्यात कृष्णा नदीवर पुलांच्या उभारणीवरही भर दिला आहे.  सुखवाडी-तुंग हा कृष्णा नदीवरील पूल उभारण्यासाठी शासनाने १४ कोटीची तरतूद केल्याचेही ते म्हणाले. याबरोबरच अंकलखोप येथे १ कोटी रुपये खर्चाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी करण्याबरोबरच अन्य विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.  
पलूस शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचा चौपदरीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, पलूस येथे तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांसाठी सुसज्ज इमारती उपलब्ध करून दिल्या आहेत. तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी यापुढे दर महिन्याला पंचायत समितीकडील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बठकांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी सभापती यास्मीन पिरजादे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी रविकांत अडसूळ यांनी मागील आमसभेचे इतिवृत्त वाचून या सभेपुढील विषय विषद केले. यावेळी सर्व शासकीय व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विभागांकडील कामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.