19 November 2019

News Flash

ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला

या मार्गावरील एका वळणावर भराव खचल्याने सगळा रस्ताच दरीत वाहून गेला आहे.

सातारा ते ठोसेघर दरम्यान सज्जनगडच्या पुढे घाटरस्ता खचला असून रस्त्याचा मोठा भाग दरीत वाहून गेला आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.      (छाया- संजय कारंडे )

कराड : सातारा जिल्ह्य़ातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता सज्जनगड फाटय़ाच्या पुढे खचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील एका वळणावर भराव खचल्याने सगळा रस्ताच दरीत वाहून गेला आहे. सध्या पावसामुळे ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद न केल्यास अपघाताचा धोका संभवतो.

पश्चिम घाट परिसरात गेल्या १५ दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांची दैना झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचणे, रस्त्यावरील खड्डय़ांची खोली वाढणे असे प्रकार घडल्याचे दिसत आहे.  सज्जनगडच्या परळी खोऱ्यात ठोसेघरकडे जाणारा घाटरस्ता या संततधार पावसामुळे काल गुरुवारी वाहून गेला. बोरणे घाटातील हा रस्ता संरक्षक कठडय़ासह ढासळल्याने याठिकाणी अर्ध्याहून अधिक रस्ताच अस्तित्वात नाही. सध्या येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने संरक्षक कठडे लावून तात्पुरती दक्षता घेतली आहे. मात्र उर्वरित रस्त्यावरून वाहतूक अद्याप सुरू असल्याने अपघाताचा धोका संभवतो आहे.

या ढासळलेल्या भागाच्या ठिकाणी ढिसाळ माती असल्याने हळूहळू हा रस्ता आणखी ढासळत असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत. तसेच मोठा पाऊस झाल्यावर हा उर्वरित रस्ताही वाहून जाण्याचा धोका आहे. ठोसेघर धबधब्याबरोबरच या परिसराच्या सभोवतालच्या निसर्गाचे समृद्ध, नयनरम्य वातावरण पाहण्यासाठी लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते.

रोज शेकडो पर्यटक विविध वाहनातून येत असतात. अशावेळी  या खचलेल्या रस्त्याच्या जागी मोठा अपघात संभवतो. सध्या रस्ता ढासळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने लोखंडी जाळय़ा लावून येथे धोका आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मोठय़ा वाहनांच्या वाहतुकीवर कसलेही बंधन आणलेले नाही. अरूंद आणि खचलेला रस्ता, धो-धो कोसळणारा पाऊस, रात्रीचा अंधार आणि ठोसेघरकडे  विविध वाहनातून धावणारे उत्साही पर्यटक यातून एखाद्या अपघाताचा धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे.

First Published on July 13, 2019 2:18 am

Web Title: road going to thoseghar waterfalls collapsed after heavy rain zws 70
Just Now!
X