मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघातांना निमंत्रण; दुरुस्तीकडे महामंडळाचे दुर्लक्ष

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कोटय़वधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेले रस्ते नादुरुस्त झाले असून वाहतुकीस धोकादायक झाले आहे. यातच मुख्य रस्त्यावर एक फुटापेक्षा अधिक खड्डे असल्याने येथील रस्तेच जीवघेणे असल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावरील खड्डय़ांमुळे याठिकाणी अपघात घडत असतानाही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे औद्योगिक विकास महामंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राज्य औद्योगिक विकास महामंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रात दोन वर्षांपूर्वीच संपूर्ण रस्त्यांचे बांधकाम केले होते. कोटय़वधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या रस्त्यांची दोन वर्षांतच दयनीय अवस्था झाल्याने कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका येथे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोठा खड्डा पडलेला पाहावयास मिळतो. याच खड्डय़ात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने वाहन मध्येच अडकले जाते. काही वेळा दुचाकीस्वारांचा अपघातही याठिकाणी नेहमीच होत असतो. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. असे असले तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

औद्योगिक क्षेत्रात दिवसरात्र शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे अचानक समोर येणाऱ्या खड्डय़ामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत असल्याने अपघाताची स्थिती नेहमीच निर्माण होते. यामुळे येथील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची मागणी नागरिकांकडून नेहमीच केली जाते. करमतारा कारखान्यांच्या बाजूला पडलेल्या खड्डय़ामुळे रात्रीच्या वेळी याठिकाणी अंधार असल्याने वेगाने येणारे वाहन अचानक खड्डय़ात आदळत असल्याने याठिकाणी भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

जलवाहिनी फुटल्याने याठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यावर तातडीने खडी व माती टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी रस्त्यावर येत्या काही दिवसांत डांबरीकरण करण्यात येणार आहे. – राजेंद्र तोतला, उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ