News Flash

रामकुंड ते गाडगे महाराज पुलादरम्यान स्नानाविषयी भाविकांमध्ये संभ्रम

साधू-महंतांच्या शाही स्नानावेळी रामकुंड आणि सभोवतालच्या परिसरात भाविकांना प्रतिबंध राहणार असला तरी त्र्यंबक रस्ता आणि गंगापूर रस्त्याकडून येणाऱ्या भाविकांना जुन्या नाशिकलगतच्या गोदापात्रात स्नानासाठी जाता येईल.

| August 25, 2015 05:00 am

साधू-महंतांच्या शाही स्नानावेळी रामकुंड आणि सभोवतालच्या परिसरात भाविकांना प्रतिबंध राहणार असला तरी त्र्यंबक रस्ता आणि गंगापूर रस्त्याकडून येणाऱ्या भाविकांना जुन्या नाशिकलगतच्या गोदापात्रात स्नानासाठी जाता येईल. तथापि, तशी संधी पंचवटीकडील भाविकांना मिळणार नसल्याचे जाहीर झालेल्या नियोजनावरून दिसते. साधू-महंतांचे स्नान झाल्यानंतर रामकुंड व सभोवतालच्या परिसरात भाविकांना स्नान करता येईल, असे यंत्रणेने जाहीर केले आहे. पण, पंचवटीकडील परिसरातून रामकुंड ते गाडगे महाराज पूल या भागापर्यंत गोदाकाठाकडे येण्यासाठी कोणताही भाविक मार्ग दृष्टीपथास पडत नसल्याने भाविकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
कुंभमेळ्यातील पहिल्या शाही पर्वणीला अवघ्या चार दिवसांचा अवधी राहिल्याने पोलीस, जिल्हा प्रशासन व इतर सर्व शासकीय विभागांनी नियोजन पूर्णत्वास नेले आहे. गोदावरीत स्नानासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने गर्दीचे नियोजन हे यंत्रणांसमोरील मुख्य आव्हान आहे. त्यादृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली असून कोणत्याही एका घाटावर भाविकांची गर्दी होऊ नये, याकडे विशेषत्वाने लक्ष दिले गेले आहे. गतवेळी शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. तसे काही पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पर्वणीचा आधीचा दिवस, पर्वणीचा दिवस आणि पर्वणीनंतरचा दिवस असे सलग तीन दिवस शहरात खासगी वाहनांना प्रतिबंध राहणार आहे. आपली वाहने बाह्य वाहनतळावर उभी करून भाविकांना शहर बससेवेने अंतर्गत वाहनतळावर येता येईल. तिथून गोदावरीकडे पायी निश्चित करून दिलेल्या मार्गावरून जावे लागणार आहे.
भाविकांना वेगवेगळ्या घाटावर नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावर नजर टाकल्यास पंचवटीकडील भागातून येणाऱ्या भाविकांना मालेगाव मोटार स्टँड अर्थात रामकुंडापासून ते गोदावरीच्या खालील भागात असणाऱ्या गाडगे महाराज पुलापर्यंत येण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याचे दिसते. शाही पर्वणीच्या दिवशी नाशिकमध्ये वेगवेगळे महामार्ग आणि रेल्वेमार्गाने येणाऱ्यांसाठी आठ भाविक मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्गाने आग्रा, धुळे व मालेगावकडून येणाऱ्या भाविकांना निलगिरी बाग येथून औरंगाबाद रस्त्यावरून नांदुरनाका ते नांदूर-मानूर घाट येथे स्नानासाठी नेले जाईल. औरंगाबादकडून येणाऱ्या भाविकांना अंतर्गत वाहनतळावरून पायी नांदूर-मानूर घाटावर तसेच टाकळी संगम घाट येथे स्नानासाठी जाण्याचे पर्याय उपलब्ध आहे. पुण्याकडून व रेल्वेने येणारे भाविक सैलानी बाबा दर्गालगतच्या अंतर्गत बस स्थानकापासून पायी दसक घाटाकडे जातील. मुंबईकडून येणारे भाविक मुंबई नाका महामार्ग बस स्थानकातून पायी लक्ष्मी-नारायण घाटावर स्नान करतील. त्र्यंबकरोडकडून एसटीने येणारे भाविक महामार्गालगतच्या टॅक्सी स्टँडवरून पायी लक्ष्मी-नारायण घाटावर स्नान करतील. त्र्यंबक रस्त्याने पायी येणाऱ्या भाविकांना मायको सर्कल येथे उतरवून पायी रोकडोबा मैदानावर आणि रोकडोबा सांडव्यावरून गौरी पटांगणात स्नानासाठी जातील. गिरणारे, दुगाव आणि पेठ रोडकडून येणारे भाविक डोंगरे वसतीगृह मैदानावरून रामसेतु पुलाच्या डाव्या बाजूने निळकंठेश्वर मंदिर, यशवंतराव महाराज पटांगण घाट व गांधी तलाव घाटावर स्नानासाठी जातील. दिंडोरीकडून येणारे भाविक क. का. वाघ महाविद्यालयासमोरील एसटी बस स्थानकातून पायी टाळकुटेश्वर घाटावर जावून स्नान करतील.
भाविकांच्या सर्व मार्गाची बारकाईने पाहणी केल्यास जुन्या नाशिककडील गोदापात्रावर भाविकांना स्नानासाठी जाता येईल असे नियोजनावरून दिसते. त्र्यंबकेश्वरकडून पायी येणारे भाविक तसेच गिरणारे, दुगाव व पेठकडून येणाऱ्या भाविकांना रामकुंडासमोरील पात्रात पलीकडील बाजूला स्नानासाठी जाता येईल. मात्र, या स्वरुपाची कोणतीही व्यवस्था रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या घाटांवर झाली नसल्याचे दिसते. पंचवटीतील भाविकांना या घाटाकडे येण्यासाठी कोणताही भाविक मार्ग निश्चित केलेला नाही. साधू-महंतांच्या शाही स्नानावेळी रामकुंड परिसरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यांचे शाही स्नान झाल्यानंतर भाविकांना या परिसरात स्नानासाठी प्रवेश दिला जाईल असेही सांगितले जाते. मात्र, भाविक पंचवटीकडील भागातील नदीपात्रालगत कसे पोहोचणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2015 5:00 am

Web Title: road to kumbh complete open to traffic
टॅग : Kumbh,Kumbh Mela
Next Stories
1 डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह जानेवारी २०१६ पर्यंत आरक्षित
2 संथाराचा निर्णयाविरुद्ध जैन समाजाची मौन रॅली
3 प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी!
Just Now!
X