नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : पावसाळ्यात रस्तेकाम अडून पडेल आणि नागरिकांना खड्डय़ांतून प्रवास करावा लागेल, या काळजीपोटी डहाणू नगरपरिषदेने जनतेच्या कररूपी पैशांची उधळमाधळ इतकी जोमाने सुरू ठेवली आहे, की रस्त्यात असलेले विद्युत खांब पर्यायी ठिकाणी न हलवताच रस्त्याचे काम आटोपले आहे. आता हे काम वाहतुकीच्या आड येत असल्याने तक्रारींचा पाऊस पडत आहे. त्यांना तोंड देताना नगरपरिषदेची फेफे उडाली आहे.

डहाणू शहरात पूर्वेला पटेलपाडा रोड आहे.  रेल्वे  संरक्षण  भिंतीला लागून  हा रस्ता  आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले  आहे. मात्र, या रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आले आहेत. खरेतर आधी हे खांब पर्यायी ठिकाणी हलवून मगच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करणे आवश्यक होते. यासाठी महावितरणशी पत्रव्यवहार करणे गरजेचे होते.  परंतु तसे काहीन करताच रस्ता रुंदीकरणाचे काम आटोपून घेण्यात आले आहे.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी खांब एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणे वेळखाऊ होते. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवणे  कठीण होऊन बसले असते, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.  आता नगर परिषदेने वीज महावितरणशी पत्रव्यवहार  करुन त्यांना खांब हलविण्यासाठी विनंती केल्याचे सांगितले आहे.

पटेलपाडा येथील विद्युत खांब हलविण्यासाठी डहाणू नगर परिषद  वीज महावितरणला कळवले आहे. या कामासाठी  निविदा काढल्या जातील. नगरपरिषद वीज महावितरणला काम सोपविणार आहे. त्यासाठी महावितरणला  निधी  देणार आहे.

-अतुल पिंपळे, मुख्याधिकारी डहाणू नगरपरिषद