|| रमेश पाटील

निविदा होऊनही रस्त्यांची कामे रखडली; नगरसेवकांच्या कुरबुरी पथ्यावर

वाडा: तालुक्याला तीन आमदार लाभूनही तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई या समस्या सोडविण्यास लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. वाडा नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया होऊन वर्ष झाले तरी नगरसेवकांच्या वेळकाढूपणामुळे व अंतर्गत राजकारणामुळे वर्षभरात एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही, असा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे.

वाडा शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, गायत्री नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांकडे स्थानिक नगरसेवकांचे अंतर्गत कुरबुरींमुळे दुर्लक्ष झालेले आहे. या रस्त्यावर नळांचे पाईप उघड्यावर पडल्यांने दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. ठिकठिकाणी इतके रस्ते उखडलेत की, या रस्त्यांवर चालणेही कठीण होत आहे. नव्याने रस्ता व्हावा म्हणून नगरपंचायतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करूनही रस्त्याचे काम सुरु होऊ शकलेले नाही. त्यामुळे शिवाजीनगर, शास्त्रीनगर, गायत्री नगरची वाट दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनली आहे.

शिवाजीनगरला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी नगरपंचायतीने विशेष रस्ता निधी अंतर्गत कॉँक्रीटीकरणासाठी सुमारे २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यासाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. निविदा प्रक्रिया होऊन वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने अजूनपर्यंत रस्त्याचे काम सुरु होऊ शकलेले नाही.

शिवाजीनगर, शास्त्रीनगर, गायत्री नगर परिसराला चार नगरसेवक लाभलेले असताना रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. श्रेयवादामुळे हे काम अडकल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या वादामुळे या विकासकामाचा निधीच परत जाण्याची भीती आता  नागरिक व्यक्त करित आहेत. अंतर्गत रस्त्यांबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा भूमी अशा अनेक समस्यांना वर्षोनुवर्षे येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. वाडा नगरपंचायतीचा एकूण कारभारच आशादायक नसल्याने मोठ्याप्रमाणावर निधी मिळूनही विकासकामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे वाडा शहर दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत अडकू लागल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील चांबळे, डाकिवली, खानिवली, कळंभे अशा विविध खेडे गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांकडे वाडा तालुक्याला लाभलेल्या आमदार शांताराम मोरे, दौलत दरोडा, सुनिल भुसारा या तिन्ही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. येथील नागरीकांनी वारंवार संबंधित विभागांकडे तक्रारी अर्ज, विनंत्या, आंदोलनेही केलेली आहेत. मात्र, प्रशासनानाकडून दखल घेतली गेलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडेही प्रशासन लक्ष देत नाही प्रशासन लोकप्रतिनिधींना जुमानत नाही असा सवाल येथील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

 

वाडा शहरातील विकास कामे जलदगतीने होण्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे, मात्र येथील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने विकास कामे रखडली जात आहेत.  – मनिष देहरकर, भाजपा गटनेता, वाडा नगरपंचायत

 शिवाजीनगर रस्त्यांच्या कामाचे तीन टप्पे करण्यात आले असून येत्या काही दिवसांत या कामांना सुरुवात होईल. – सुचिता पाटील, सभापती, बांधकाम समिती, वाडा नगरपंचायत