किनारा, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा; खडतर प्रवासानंतर पर्यटनाचा आनंद

पालघर : गुजरातपासून मुंबईपर्यंतच्या पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या केळवा पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते दुरवस्थेत सापडल्याने या पर्यटनस्थळाकडे पर्यटक पाठ फिरवतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

केळवे समुद्रकिनारा व तेथील शीतलामाता मंदिर हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक निसर्गरम्य समुद्रकिनारा व देवीच्या दर्शनासाठी येत असतात. शनिवार—रविवारी तर समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरलेला असतो. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे येथील पर्यटन हळूहळू कमी होईल की काय अशी भीती पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनारी जाण्यासाठी असलेले मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने या ठिकाणाहून वाहने नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे ठरत आहे.

पर्यटनस्थळामुळे केळवे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी येथील रस्ते सुसज्ज व दळणवळणाच्या दृष्टीने चांगल्या दर्जाचे बनवले होते. मात्र रस्त्यावरील वाढती रहदारी व वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील डांबरी व काँक्रीट रस्ते देखभाल न केल्याने दुरवस्थेत सापडले. त्यानंतर हे रस्ते दुरुस्त करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्डय़ात रस्ता असा प्रश्न पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना पडत आहे. केळवे समुद्रकिनारी जाण्यासाठी पर्यटकांना वाहनाशिवाय पर्याय नाही. ही वाहने ज्या रस्त्यावरून जातात त्या रस्त्यावरच मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून पर्यटक येण्याचे टाळत असल्याने येथील पर्यटन व्यवसाय कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनासह जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाने या बाबीकडे जातीने लक्ष घालून हे खड्डेमय रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

सिमेंट रस्त्याचीही दुर्दशा

पूल नाका परिसराच्या मुख्य डांबरी रस्त्याने मुख्यत्वे केळवे गावात प्रवेश केला जातो. येथूनच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डय़ांना सुरुवात होते. पुढे जुने पोलीस स्थानक येथून ते शीतलामाता मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याची पार दुरवस्था आहे.  या रस्त्यांचे आवरणच उखडून गेल्याने रस्ता खडबडीत झालेला आहे. केळवे  कौलघर ते केळवे बिच रस्त्याचीही तशीच अवस्था आहे.

केळवे हे पर्यटकांसाठी र्पयटनकेंद्र आहे. रस्त्याच्याअ दुरावस्थेमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली तर आता कुठे उभारी मिळत असलेल्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होतील.याचा प्रशासनाने विचार करावा.

आशिष पाटील,अध्यक्ष, केळवा बीच पर्यटन उद्योग विकास संघ