सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साताऱ्याजवळ सह्याद्री एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हुबळी एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील आगरकी गावाजवळ घडली. सिग्नल न मिळाल्याने रेल्वे थांबल्यानंतर दरोडेखोरांनी दगडफेक करत रेल्वेत प्रवेश केला. या दरोड्यात चोरीस गेलेल्या ऐवजाबाबत अद्याप समजू शकलेले नाही. उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आगरकी गावाजवळ दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस आणि पुण्याहून मिरजच्या दिशेने जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनस हुबळी एक्स्प्रेस थांबवली. त्यानंतर दगडफेक करत दरोडेखोरांनी रेल्वेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे प्रवासी प्रचंड दहशतीत होते. नेमका किती मुद्देमाल गेला याची माहिती समजू शकलेली नाही. मिरज रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.