रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिरातील चांदीच्या वस्तू चोरणाऱ्या चोरटय़ांना शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. उदय सुधाकर कोलते (वय ३९, रा.शिंपोशी, ता.लांजा) व मारूती सीताराम हळदणकर (वय ३६, रा.कशेळी, ता.राजापूर) अशी चोरटय़ांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे १ लाख रुपयांचे देवीचे दागिने जप्त केले.     
कोलते व हळदणकर हे दोघे आज गुजरी भागातून जात होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडील प्लास्टिकच्या पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये दागिने दिसून आले. दागिन्यांविषयी चौकशी केल्यावर त्यांनी हे दागिने भगवती मंदिरातून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी १२३ ग्रॅम वजनाची प्रभावळ, घुंगराची छत्री, कीर्तिमुख आदी चांदीच्या दागिन्यांसह ९८६ ग्रॅम वजनाची वाकवलेल्या अवस्थेतील चांदी जप्त केली. दोघा चोरटय़ांना कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.