अंबड पोलीस ठाण्यापासून जवळच असलेली स्टेट बँकेची ‘एटीएम’ यंत्रणा शुक्रवारी रात्री चोरटय़ांनी फोडून १४ हजार ७०० रुपये लंपास केले. यंत्रणेतील संपूर्ण रोकड काढण्यासाठी चोरटय़ांनी बरीच खटपट केली. परंतु, त्यांना यश आले नाही. यामुळे लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. साधारणत: पंधरा दिवसांपूर्वी सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात याच पद्धतीने एटीएम यंत्रणा फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
एटीएम केंद्रांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याची वारंवार सूचना करूनही बँका त्यात अनास्था दाखवीत असल्याची पोलीस यंत्रणेची तक्रार आहे. यामुळे शहरातील अशी अनेक एटीएम केंद्रे रामभरोसे असल्याचे उघड झाले होते. शुक्रवारी रात्री चोरटय़ांनी स्टेट बँकेच्या अशाच एटीएम केंद्राला लक्ष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे, अंबड पोलीस ठाण्यालगतच्या विजयनगर परिसरात हे केंद्र आहे. त्यातील दोन एटीएम यंत्रणा फोडण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला. यंत्रणेचा पत्रा कापून त्यातील रोकड काढण्यासाठी चोरटय़ांनी बरीच खटपट केली. या वेळी १४ हजार ७०० रुपयांची रोकड त्यांच्या हाती लागली. परंतु, मोठी रोख रक्कम ज्या भागात ठेवली जाते, तो भाग त्यांना उघडता आला नाही. यामुळे लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयावरून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्रिमूर्ती चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम केंद्र फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये समान कार्यपद्धती असल्याने दोन्ही घटनेतील चोरटे एकच असण्याची शक्यता तपास यंत्रणेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, संपूर्ण शहरात खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम केंद्रांची संख्या वाढत असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत बँका आवश्यक ते उपाय करत नसल्याचे दिसून येते. एकटय़ा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध बँकांची ४० ते ५० हून अधिक एटीएम केंद्रे आहेत. परंतु, त्यातील केवळ काही निवडक केंद्रांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाते, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस यंत्रणेने सर्व बँकांना एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक तैनात करण्याची सूचना पत्रांद्वारे केली होती. परंतु, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जाते.