शहरातील औरंगाबाद रस्त्यावरील विविध वसाहतींमध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. या परिसरातील पाच ते सहा घरे फोडून चोरटय़ांनी सुमारे तीन ते चार लाखांचा ऐवज चोरून नेला. एकाच टोळीचा हा उद्योग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सूर्यनगर परिसरात चोरटय़ांनी या चोऱ्या केल्या. मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटेपर्यंत या परिसरात चोरटय़ांचा धुडगूस सुरू होता. सूर्यनगर येथील सुदर्शन अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी दोन बंद फ्लॅटच्या दरवाजांची कुलपे तोडून तागड व भणगे यांच्या घरात चोऱ्या केल्या. ही घरे बंद असल्याने चोरीचा निश्चित तपशील समजू शकला नाही. या अपार्टमेंटच्याच शेजारील अब्राहम निळे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरात शोधाशोध घेत पाच तोळे सोने व ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
औरंगाबाद राज्यमार्गालगत चिपाडे मळा येथेही (हॉटेल सनी पॅलेसजवळ) चोरटय़ांनी रामचरण पांडे व बेळगे यांची घरे फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथे त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. जवळच नाना गिते यांची टपरीही चोरटय़ांनी फोडली. येथेही त्यांची निराशाच झाली.
चोरटय़ांनी पाळत ठेवून हे चोरीसत्र घडवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मुख्यत: या परिसरातील बंद घरेच चोरटय़ांनीच फोडली असून, त्याची माहिती त्यांनी आधी गोळा केली असावी. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरसेवक महेश तवले यांना या चोरीची माहिती दिली. त्यांनीच पोलिसांना या चोरीसत्राची माहिती दिली. तवले स्वत: तातडीने काही घरांमध्ये पोहोचले. हा प्रकार पाहून त्यांनी तोफखाना पोलिसांना ही माहिती कळवली, मात्र पोलिसांनी येथे येण्यास विलंब केला, अशी तक्रार तवले यांनी केली आहे. या भागात पहाटेपर्यंत चोरच्यांचा हैदोस सुरू असताना केवळ प्राथमिक खबर घेऊनही दुपारी पोलीस येथे पोहोचले, असे त्यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली असून, पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली.