दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या यमगरवाडी (तालुका तुळजापूर) येथील जोगदंड कुटुंबीयांवर शनिवारी रात्री दरोडेखोरांनी अचानक घाला घातला. शेतवस्तीला असलेल्या जोगदंड यांना काही कळण्याआतच होत्याचे नव्हते झाले. या सशस्त्र दरोडय़ात या कुटुंबातील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकारामुळे जिल्ह्य़ात मोठी खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात भुरटय़ा चोरांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यातच हा सशस्त्र दरोडा व त्यात महिलेचा बळी जाणे म्हणजे पोलीस प्रशासनाच्या नाकत्रेपणाचे फलित असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. यमगरवाडीच्या शेतवस्तीत पांडुरंग जोगदंड यांचे घर आहे. शेतातून घरी येण्यास त्यांना मध्यरात्र झाली. मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास जोगदंड हे पत्नी काशीबाई व मुलगा सखाराम यांच्यासोबत जेवण करीत होते. अचानक हिरव्या रंगाचे कपडे घातलेले ५-६ दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. जोगदंड कुटुंबीय जेवत असतानाच त्यांच्यावर दरोडेखोरांच्या टोळीने जांभिया हत्याराने हल्ला केला. हल्ल्यात काशीबाई (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पांडुरंग व सखाराम जोगदंड हे पिता-पुत्र गंभीर जखमी झाले.
दरोडेखोरांनी जोगदंड यांच्या घरातील सोन्याचे दोन ग्रॅमचे बदाम, तीन मोबाईल, सोन्याचे मणी व रोख ६ हजार रुपये रोकड असा १९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सयाजी खंडू सुरवसे यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात रविवारी या घटनेची नोंद झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी विधाते यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. दरोडय़ाच्या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.