लूटमार करणा-या जोडप्यासहित तिघांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी शहरात अटक केली. त्यामध्ये प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी कल्याणहून पळवलेली एक कार व तीन चॉपर हस्तगत करण्यात आले. तिघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
दिलीप यादव घोडके व त्याची पत्नी राणी या दोघांसह ताराचंद तुळशीराम कचरे (रा. अंतरवेली, शेवगाव) अशी या तिघांची नावे आहेत. घोडके पती-पत्नी पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी या गावातील आहेत. घोडके हा अट्टल गुन्हेगार आहे. मात्र दिलीप व राणी या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. दोघे एकत्रच गुन्हेगारी करतात. महिलांच्या गळय़ातील दागिने हिसकावण्यात राणी तरबेज आहे. या तिघांकडून एमआयडीसी पोलिसांनी किमान पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.
काही दिवसांपूर्वी या तिघांनी कल्याणहून एक मारुती व्हॅन (एमएच ०५ आर २४१७) पुण्याला जाण्यासाठी भाडय़ाने ठरवली. नंतर हडपसर भागात चालकाला मारहाण व दमदाटी करून गाडी पळवून नेली. काही दिवसांपूर्वी पांढरीपूल भागात एका महिलेच्या कानातील दागिनाही हिसकावून पळवला. त्या महिलेचा कान तुटला, मात्र तिने फिर्याद दिली नाही. काल सायंकाळी नगरच्या लालटाकी भागात राहणारे सुरेश विश्वनाथ शिर्के शेवगाव व पाथर्डी भागात माल पोहोचून व वसुली करून पिकअप व्हॅनमधून नगरकडे परतत असताना या तिघांनी मारुती व्हॅन आडवी लावून शिर्के यांना मारहाण केली व त्यांच्याकडील ४० हजार रुपये पळवले. नंतर नगरकडे येत असताना जेऊर नाक्याजवळ रखवालदाराच्या गळय़ातील सोन्याची साखळीही हिसकावली.
सहायक निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक एस. डी. गोरडे, वाय. एल. शेख, मनोहर शेजूळ, अमित महाजन, गणेश नागरगोजे, योगेश ठाणगे, प्रवीण खंडागळे आदींनी माहिती घेतली असता, त्यांना मारुती व्हॅन नगर शहरात फिरत असल्याचे समजले. त्यानुसार पाठलाग करून ही व्हॅन व तिघांना शहराच्या पंचपीर चावडी भागात अटक करण्यात आली.