पोयनाड दरोडय़ाची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश
मुंबई, ठाणे, भिवंडीसह राज्यातील इतर भागांत जबरी चोरी आणि दरोडे टाकणारी आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोयनाड येथील एका ज्वेलर्सवर टाकण्यात आलेल्या दरोडय़ाच्या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आणि या आंतरराज्यीय टोळीचा खुलासा झाला. या सर्वावर आता मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा विचार पोलीस करत आहेत.
गेल्या महिन्यात पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्स या दुकानावर पाच ते सहा जणांच्या टोळीने दरोडा सशस्त्र दरोडा टाकला होता. या दरोडय़ात ८० लाख रुपये किमतीचे दागिने व नऊ लाख रुपयांची रोकड पळवून नेण्यात आली होती. या घटनेतील एका आरोपीला स्थानिकांनी पकडले होते. मात्र उर्वरित आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते. तेव्हापासून पोलीस या सर्वाच्या मागावर होते.
आता या दरोडय़ामागे एक आंतरराज्यीय टोळी असल्याचे आता पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरोडय़ातील मुख्य सूत्रदार आणि त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून ६४० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या तिघांनाही ३ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून अजूनही दोन आरोपींचा शोध सुरू आहे. हे दोघे तामिळनाडू राज्यातील आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपकी चार जण हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत. यातील दोघांवर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोयनाड येथे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीने पोयनाड परिसरातून यापूर्वी एक गाडी चोरली असल्याचेही समोर आले आहे.
त्यामुळे वेगवेगळ्या विभागातून गाडय़ा चोरायच्या आणि नंतर त्याच गाडय़ा दरोडे आणि जबरी चोऱ्यांसाठी वापरायच्या ही या टोळीची कार्यप्रणाली असल्याचे दिसून आले आहे. या सर्वावर आता मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी दिले आहेत.
या प्रकरणात श्रीगाव परिसरातील काही स्थानिकांचा हात असल्याचे आता समोर आले आहे. दरोडा टाकल्यानंतर पळून जाण्यासाठी श्रीगावमधील एका व्यक्तीची गाडी वापरण्यात आली आणि त्याचबरोबर त्याच्या साथीदारांची मदत घेतल्याची बाब समोर आली आहे. या सर्वाची चौकशी सध्या सुरू असून गुन्ह्य़ात त्यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाले तर त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हानकोटी, पोयनाड पोलीस ठाण्याचे सहनिरीक्षक राजमहंमद राजे, सायबर सेलचे प्रमुख प्रमोद बडाख, सुरेंद्र गरड, सुदर्शन गायकवाड या पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग होता. अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार या तपासावर लक्ष ठेवून होते.