नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राळेगण थेरपाळ गावातील अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेतून चोरट्यांनी रविवारी रात्री ४५ लाख रुपयांची रोकड पळवून नेली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यात असलेल्या राळेगण थेरपाळ गावामध्ये अहमदनगर जिल्हा बॅंकेची शाखा आहे. रविवारी बॅंकेला सुटी होती. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बॅंकेचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बॅंकेच्या तिजोरीतील ४५ लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.