येथील मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या चौघा पोलिसांनी गडिहग्लज येथील व्यापाऱ्याच्या तिजोरीतील ३ लाख ८५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रकार केला. चौघा आरोपींना शनिवारी आजरा येथील न्यायालयात दाखल केले असता. न्या. ए. बी. तहसीलदार यांनी १२ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकारामुळे खाकी वर्दीत बोकाळलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या गुन्ह्याबाबत प्रविण ईश्वर मोहिते (वय २६ रा. तासगांव), दीपक चंद्रकांत पाटील (वय ३१ रा. कोल्हापूर), अमर सुभाष उबाळे (वय २६ रा. कोल्हापूर) व सुशीलकुमार मोहन गायकवाड (रा. आदळे ता. पन्हाळा) या चौघा पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कडगाव मार्गावरील गंगूआक्का निवास येथे हबीब रावतार यांचा भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास चार भारदस्त वेशातील  तरुण रावतार यांच्या दुकानात आले. त्यांनी आपण पोलीस खात्यातील स्पेशल स्कॉड ब्रँचमधून आलो असून तुम्ही बेकायदेशीरपणे सावकारी करून नागरिकांची लूट करता याबद्दल तक्रार आली असल्याचे सांगितले. त्यांनी स्वतचे ओळखपत्र दाखवले. त्यावेळी दुकानात हबीब रावतार यांची दोन मुले सद्दाम व नसरुद्दीन रावतार यांच्यासह एक कामगार होता. त्यांनी मालक दुकानात नाहीत, असे पोलिसांना सांगितले. पण बलदंड शरीरयष्टीच्या चौघा पोलिसांनी त्यांचे काहीएक न ऐकता दुकानाचा दरवाजा बंद करून तिघांनाही पट्टय़ाने बेदम मारहाण केली. थोडय़ा वेळानंतर तुमचे रेकॉर्ड दाखवा, वह्या दाखवा अशी दमदाटी करत तिजोरीच्या चाव्या काढून घेऊन तिजोरीतील सुमारे ३ लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर भ्रमणध्वनीवरून मालकांना फोन लावण्यास सांगितले. दुकानाचे मालक हबीब रावतार यांनी आपण बाहेरगावी असल्याने तासात येतो, असे सांगितले.
दरम्यान, त्या चारही पोलिसांनी दुकानातील कामगारांना फरशीवर बसवून तिजोरीतील रक्कम त्यांच्यासमोर ठेवून मोबाईलवर त्यांचे फोटो काढले. दरम्यान, हा प्रकार समजल्यावर काही नागरिक तेथे आले; पण त्या चार पोलिसांनी दमदाटी करून कोणालाही आत येऊ दिले नाही. दुपारी अडीचच्या सुमारास दुकानाचे मालक हबीब दुकानात गेल्यानंतर त्या चार युवकांनी अब्दुल वाहीद व हाबीब रावतार यांना चारचाकीमध्ये (एम एच ०९ बीबी ७५९) बसवून गाडी कोल्हापूर येथील पोलीस मुख्यालयात नेली. चारचाकी पोलीस ठाण्यात न नेता गाडीतच हबीब यांना तुम्ही २५ लाख रुपये द्या; तुमचे प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवू, असे सांगितले. पण हबीब यांनी आपल्याकडे इतके पसे नसल्याचे सांगितल्याने चारचाकी पुन्हा शाहूपुरीसह अन्य पोलीस ठाण्याच्या दारात नेऊन तुमच्या विरोधात या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार आहे, असा दम दिला. हबीब यांनी संबंधितांना तुम्ही माझ्यावर गडिहग्लज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करा. त्यासाठी मला गडिहग्लजला घेऊन चला, असे सांगितले. त्यानुसार ते सर्वजण गडिहग्लज येथे परत आले.  
हबीब यांनी ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. दुकानातील तिजोरीमधील  ३ लाख ८५ हजार रुपये त्या चारही युवकांनी काढून घेतले होते. उरलेले १ लाख १५ हजार रुपये घेण्यासाठी ते चारही युवक  गडिहग्लज येथील एका महाविद्यालयाच्या मदानावर आले. तेथून हबीब यांनी आपल्या नातेवाइकांना फोन करून १ लाख १५ हजार रुपये घेऊन मदानावर येण्यास सांगितले. यावेळी संबंधित नातेवाइकांनी गडिहग्लज पोलिसांत धाव घेऊन घडलेली हकिकत सांगून पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गडिहग्लज पोलिसांना पाहूनही त्या चौघांवर कोणताही फरक पडला नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनी पशाची विचारणा केली. त्यांच्या उर्मटपणाचा कळस पाहून पोलिसांनी चारचाकीसह त्या युवकांना व रावतार यांना सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस ठाण्यात आणले. साडेसातपासून घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस उपअधीक्षक अशोक भरते आठ वाजल्यापासून गडिहग्लज पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते; पण गुन्हा करणारे आपल्याच खात्यातील असल्यामुळे त्यांनी ही हकिकत वरिष्ठांना कळवली. रात्री १०.४० च्या सुमारास अतिरिक्त पोलीस अधीक्षक महंमद मकानदार हे गडिहग्लज पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आले. मात्र गृहखात्यातील हा गंभीर प्रकार असूनही त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी वरिष्ठ अधिकारी घेत होते. एरव्ही लहान-सहान घटनांची माहिती पत्रकारांना तत्परतेने पुरवणारे पोलीस आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी कसे धडपडत होते याचा नमुनाच पाहायला मिळाला.