करोनाविरुद्ध लढाई लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता सातारा जिल्हा रुग्णालयात ‘रोबो’ची मदत घेण्यात येणार आहे. टाटा टेक्‍नॉलॉजीने हा रोबो दिला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी व करोनाबाधित रुग्णांशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी याचा वापर होणार आहे.  क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात आता हा रोबो दाखल झाला आहे.

करोनाशी मागील दोन महिने आरोग्य कर्मचारी लढत आहेत. राज्याबरोबर सातारा जिल्ह्यातही करोना रुग्णांची तपासणी, उपचार व अन्य कामात असलेले आरोग्य कर्मचारीही या संसर्गाने बाधित झाले आहेत.  वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, त्या वॉर्डमधील सफाई कर्मचारी,  मदतनीस, जेवण पुरविणारे या सर्वांना वैद्यकीय अधिकाऱ्यांपेक्षा जास्त वेळ या रुग्णांच्या जवळपास जावे लागते. जिल्हा रुग्णालयात पीपीई किटसह अन्य सुविधांचा अभाव आहेच. त्यातच रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्याला याची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी कायम दडपणाखाली काम करत आहेत.

या कर्मचाऱ्यांचा कोरोनाबाधित रुग्णाशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी राज्यामध्ये काही ठिकाणी यापूर्वीच रोबोचा वापर सुरु केला आहे. रोबोची कामाची व वापराची माहिती घेऊन साताऱ्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातही अशा प्रकारचा रोबो असावा, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाठपुरावा केला. त्यातून टाटा टेक्‍नॉलॉजीने हा रोबो दिला आहे. हा रोबो जिल्हा रूग्णालाणत दाखल झाला असून करोना वॉर्डमध्ये काम करणार आहे.

या रोबोमुळे रुग्णाला दिवसातून दिली जाणारी औषधे, जेवण किंवा अन्य वस्तू लांबून देता येणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णाशी येणारा संपर्क कमी होणार आहे. परिणामी त्यांना करोनाची बाधा होण्याचा धोकाही कमी होणार आहे.
सातारच्या जिल्हा रूग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर सध्या एकच रोबो उपलब्ध झालेला आहे. त्याचे कार्य कशा प्रकारे होते, हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर जिल्ह्यासाठी आणखी रोबो मागविले जाणार आहेत. रोबो हाताळण्याचे प्रशिक्षण आज आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्यक्ष वॉर्डमध्ये त्याची कशी मदत होते, याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.