28 October 2020

News Flash

पालघर-डहाणू किनारपट्टी अबाधित

सहा धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम पूर्ण

सहा धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम पूर्ण

पालघर : टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्यातील सहा धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले.

इतर चार बंधाऱ्यांचे काम प्रगतिपथावर आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांमुळे येत्या काळात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे उसळणाऱ्या लाटांच्या तडाख्यांपासून किनारपट्टीची होणारी धूप काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सातपाटी दोन टप्प्यांत ९०० मीटर धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याच वेळी डहाणू गुंगवाडा येथे १२६ मीटर व तारापूर येथील १२८ मीटर बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय शिरगाव येथील समुद्रावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारणीसाठी अंदाजपत्र तयार करण्याच्या स्तरावर काम सुरू असून या बंधाऱ्याच्या उभारणीमुळे अनेक गावांमधील समुद्र किनाऱ्याची होणारी धूप कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, पालघर, वसई आणि डहाणू तालुक्यात अनेक ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करणे अजूनही प्रलंबित आहे. शासनाकडे अशा बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्धतेची मर्यादा येत असल्याने आगामी काळात ही कामे केली जातील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. समुद्र किनाऱ्याच्या होणाऱ्या धूपमुळे किनाऱ्यावर असलेली झाडे उन्मळून पडत आहेत.

किनाऱ्यावर नव्याने वृक्ष लागवड केली जात नसल्याने समुद्रकिनाऱ्यावर असणारे सौंदर्य कमी होत आहे. तसेच लगतच्या रहिवासी भागांमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरण्याचे प्रकार घडून नागरिकांचे नुकसान होत आहे.

थकबाकीमुळे कामे ठप्प

बंधाऱ्यांची कामे पूर्णत्वाला नेणारे, तसेच जी कामे प्रगतिपथावर आहेत अशा ठेकेदारांना मार्च महिन्यापासून कोणत्याही प्रकारची देयके देण्यात आली नाहीत. शिवाय याआधी केलेल्या कामाचा अंशत: मोबदला दिल्याने ठेकेदारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या बंधारा उभारणीच्या कामात ठेकेदारांना देयके दिली जात नसल्याने त्यांना इंधनाचा खर्चही करणे शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गेले काही दिवस बंधाऱ्याची कामे ठप्प आहेत.

लवचिक रचना

राज्याच्या पतन विभागाच्या वतीने किनाऱ्याची धूप थांबण्यासाठी दगड रचून बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. समुद्राच्या लाटांचा तडाखा बंधाऱ्यात रचलेल्या दगडांच्या भेगांमध्ये रोखला जातो. अशा दगडांच्या लवचिक रचनेमुळे पतन विभागाच्या वतीने आराखडे तयार करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी एडवण येथे ४२५ मीटर (४ कोटी ३७ लाख रुपये), नवापूर येथे ३२९ मीटर (२ कोटी ५१ लाख), सातपाटी येथे ९५ मीटर (७१ लाख), तारापूर येथे १०७ मीटर (६६ लाख), नरपड येथे २५० मीटर (९० लाख) खर्चून बंधाऱ्यांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 2:11 am

Web Title: rock dam sea coast protection at palghar dahanu zws 70
Next Stories
1 ओल्या गवतामुळे रोजगार
2 उत्तर प्रदेशातील गुंडाचा अपघाती मृत्यू
3 पंकजांना रस राज्याच्या राजकारणातच?
Just Now!
X