राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मंगळवारी ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला. त्यानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबूकवरून ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे. लहानपणी क्रिकेट खेळताना चिडका मुलगा आपली बॅट-बॉल घेऊन जायचा, तसा ईडीचा प्रकार सुरु आहे. पण फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ‘ईडी झालीय येडी! मालकाचं ऐकून काहीही करू लागलीय.!’ असं ट्विट करत पवारांवरील कारवाईवर टीका केली आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट –
लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगल खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसच हे ED च प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बारामतीत आज, बुधवारी बंद पाळण्यात येणार आहे.

आणखी वाचा- सिद्ध केलं, तुम्ही बारामतीपुरतं मर्यादित आहात – अंजली दमानिया

भाजपा सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असाही आरोप बारामतीकरांनी केला आहे. आदरणीय शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने बुधवारी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीतील नागरिकांच्या वतीने हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शारदा प्रांगण बारामती या ठिकाणी जमावे असे आवाहनही करण्यात आले आहे.