हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेवर जनक्षोभ उमटत असतानाच भाजपाच्या आमदारांनं बलात्कार थांबवण्यासाठी मुलींवर संस्कार करणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून भाजपाला टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या संदर्भानं बोलताना भाजपा आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते.
भाजपा आमदारानं केलेल्या वक्तव्याच्या हवाला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. रोहित पवार यांनी एक ट्विट करून म्हटलं आहे, “‘मुलींवर चांगले संस्कार केले, तर बलात्कार होणार नाहीत’, असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका आमदार महाशयांनी केलं. एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
‘मुलींवर चांगले संस्कार केले तर बलात्कार होणार नाहीत’, असं बेताल वक्तव्य UP तील भाजपच्या एका आमदार महाशयांनी केलं. एकीकडं आपल्या महान भारतीय संस्कृतीचा गौरव जगभरात होत असताना अशा लोकप्रतिनिधींकडून तोडल्या जाणाऱ्या ताऱ्यांमुळं त्यांच्यावरील संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2020
नेमकं काय म्हणाले होते सुरेंद्र सिंह?
“मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे” असं भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 11:45 am