गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपट सृष्टी अर्थात बॉलिवूड चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं बॉलिवूडमधील कलाकारांवर ड्रग्ज तस्करी आणि सेवनासंदर्भात आरोप केल्यानंतर हे प्रकरण पेटलं होतं. त्यानंतर अभिनेते आणि भाजपाचे खासदार रवि किशन यांनी संसदेत बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला खासदार जया बच्चन यांनी उत्तर दिलं होतं. त्यामुळे सध्या हा मुद्दा चर्चेत असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भूमिका मांडली असून, बॉलिवूडला नावं ठेवणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.”भारतीय चित्रपट सृष्टीचे भारतीय समाजमनात एक आगळंवेगळं स्थान आहे. स्व.दादासाहेब फाळके यांनी मुहूर्तवेढ रोवलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीत वर्षाकाठी वेगेवगळ्या वीस भाषांमध्ये जवळपास दोन हजार चित्रपट प्रदर्शित होत असून, चित्रपट जवळपास १७ ते १८ हजार कोटींची कमाई करतात. चित्रपटांमधील अनेक पात्र आज देखील अजरामर असून, अनेकांना आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देखील देतात .अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वे, यशस्वी व्यक्तिमत्वे चित्रपटांच्या माध्यमातून समोर येऊन समाजाला नवी दिशा देत असतात. एकुणच वेगवेगळ्या सामाजिक विषयांना मूळप्रवाहात आणण्यापासून तर समाजात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यापर्यंत वेगवेगळ्या विषयांना हात घालून समाजाची दिशा ठरवण्यात देखील चित्रपटांच मोठं योगदान राहिलं आहे,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

“आर्थिक दृष्टीने बोलायचं झाले तर जवळपास २५ हजार कोटींची प्रत्यक्ष उलाढाल चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून होत असते .यामध्ये चित्रपट निर्मिती-वितरण, चित्रपटांची कमाई, ऑनलाईन अग्रेगेटर्स, डिजिटल वितरण या माध्यमातून उलाढाल होत असते. तर अप्रत्यक्षपणे ३५ हजार कोटींची उलाढाल होत असते, अशाप्रकारे एकूण जवळपास ६० हजार कोटींच्या घरात उलाढाल होते. तसेच सरकारला देखील जवळपास २,५०० कोटींचा कर जमा होतो. भारतीय चित्रपट विदेशातून देखील हजार ते बाराशे कोटींची कमाई करतात. रोजगाराच्या बाबतीत बघितले तर जवळपास अडीच लाख प्रत्यक्ष रोजगार तर साडेचार लाख अप्रत्यक्ष रोजगार असे एकूण जवळपास सात लाख रोजगार चित्रपट सृष्टीच्या माध्यामतून उपलब्ध होतात. यामध्ये मग अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक यापासून तर कॅमेरामन, स्पॉटबॉय, तेथे छत्री धरणारा, चहा देणारा, चित्रपटगृहांमध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत अनेकांना रोजगार मिळत असतो. पर्यटनाच्या दृष्टीने बघितले, तर ज्या ठिकाणी चित्रपटांच्या शुटिंग होत असतात त्या ठिकाणच्या पर्यटनात मोठी वाढ झालेली दिसते. एका केस स्टडीनुसार थ्री-इडियट या चित्रपटानंतर लेहमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या अडीच पटीने वाढली. पर्यटनात वाढ झाली म्हणजे साहजिकच स्थानिक रोजगारामध्ये देखील वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते,” असं पवार म्हणाले.

“जगातील प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक ठिकाणी सर्वच माणसं चांगलीच असतील असं नाही, काही चांगली असतात तर काही वाईट देखील असतात. आपल्या सामाजिक आणि आर्थिक समाजजीवनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या चित्रपट सृष्टीवर सध्या अनेक आरोप देखील केले जात आहेत. आरोप खरे किंवा खोटे देखील असतील. परंतु काही वाईट लोकांमुळे सर्वच चित्रपट सृष्टी वाईट असे म्हणून देखील चालणार नाही. ज्यांनी समाजाच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे, त्यांचे कौतुक देखील केलेच पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील झालीच पाहिजे. आज सर्व कलावंताना तसेच नागरिकांना आवाहन करू इच्छितो की, चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असते, त्यामुळे कोणी राजकीय हेतू अथवा सवंग लोकप्रियतेसाठी काही माध्यमांना हाताशी धरून चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपण सर्वांनी सजग नागरिक म्हणून दुर्लक्ष करावे अथवा सत्य परिस्थिती जाणून न घेताच बळी पडू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त सेलिब्रिटी म्हणजेच चित्रपट सृष्टि नाही तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या क्षेत्रात रोजगार मिळवणारी सात लाख लोकं या चित्रपट सृष्टीचा भाग आहेत आणि यामध्ये आपल्या बॉलीवूडचा वाटा जवळपास चाळीस टक्के आहे, याचं सर्वांनीच भान ठेवायला हवं,” अशा शब्दात रोहित पवार यांनी बॉलिवूडवर आरोप करणाऱ्यांना फटकारलं आहे.