विरोधी बाकावरील भाजपाकडून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळ्या मुद्यावरून टीका केली जात आहे. त्यामुळे महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळत असून, अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारीच अधोरेखित केले होते. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेबाबत सौम्य भूमिका घेत, युतीसाठी दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- मराठा आरक्षण : “आग लावण्याचा कार्यक्रम भाजपा नेत्यांनी हाती घेतलाय”

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली आहे. “आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- …तर आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली, पण तात्त्विक मतभेदामुळे नितीशकुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रातील स्थिती अशीच काहीशी झालेली आहे. महाविकास आघाडीतील या पक्षांशी शिवसेना आणि ठाकरे यांचे जमेलच असे नाही. ठाकरे यांचे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी आजही चांगले संबंध आहेत. काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर ते थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलू शकतात. त्यामुळे भविष्यात राज्य आणि हिंदुत्वाच्या हितासाठी शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही सरकार स्थापन करू शकतो. अशी सत्ता स्थापन करण्यास आम्ही तयार आहोत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.