News Flash

“…तर तुम्ही शांत बसलेलंच अधिक योग्य राहील”; रोहित पवारांचा भाजपा नेत्याला टोला

"इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय!"

(संग्रहित छायाचित्र)

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य सरकार आमनेसामने आल्याचं चित्र आहे. करोनामुळे राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणं शक्य नसल्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. तर दुसरीकडे यावरून राजकीय नेत्यांमधील टोलेबाजीही जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यूजीसीला परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी भातखळकर यांना टोला लगावला आहे.

विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करत सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. दरम्यान, परीक्षा रद्द करण्याविषयी आमदार रोहित पवार यांनी यूजीसीकडे मागणी केली होती. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलं होतं. रोहित पवार यांच्या ट्विटवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. “तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक आहे ना?,” असं भातखळकर म्हणाले.

भातखळकर यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं. “इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय! विद्यार्थ्यांच्या जिवापेक्षा तुम्हाला फक्त राजकारण महत्त्वाचं आहे, हे गेल्या चार महिन्यांत सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळं राजकारणाशिवाय आपल्याला दुसरं काही बोलताच येत नसेल तर शांत बसलेलंच अधिक योग्य राहील,” असा टोला पवार यांनी लगावला आहे.

रोहित पवारांनी यूजीसीकडे काय केली होती मागणी?

“करोनाला घाबरून स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोजी आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. करोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा”, अशी विनंती रोहित पवार यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:01 pm

Web Title: rohit pawar reply to bjp mla atul bhatkhalkar bmh 90
Next Stories
1 सोलापुरात कडक संचारबंदी; जनतेचा उत्तम प्रतिसाद
2 “१४ दिवसांच्या विलगीकरणाचा निर्णय मागे घ्या”
3 जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय! करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा करणार दान
Just Now!
X