भाजपाचे लोक जसं मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी मंगळवारी माफी मागितली आहे. त्यामुळे फार खोलात जाण्याची गरज नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य केलं त्यामागे त्यांचा काय हेतू होता? हे तपासलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबद येथे ते बोलत होते.

“इंदुरीकर महाराज यांची कीर्तन करण्याची पद्धत साधी सोपी आहे. विविध उदाहरणांमधून ते त्यांचा मुद्दा पटवून देत असतात. व्यसनमुक्तीचे कामही इंदुरीकर महाराज करतात असंही रोहित पवार म्हणाले आहेत. उस्मानाबादमध्ये बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब. रावण आणि भक्त प्रल्हाद ही उदाहरणंही आहेत” असं इंदुरीकर महाराज त्यांच्या ओझर येथील किर्तनात म्हणाले होते. या किर्तनाची क्लीप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर हा वाद उफाळून आला. दरम्यान या सगळ्या प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे असं त्यांनी म्हटल आहे.

आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी इंदुरीकर महाराजांची बाजू घेतली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.