सांगली : ‘एफआरपी’पेक्षा जादा आणि एकरकमी दर मिळाला पाहिजे अशी स्वाभिमानीची भूमिका असून किती जादा दर  मिळावा याबाबतचा निर्णय शनिवारी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेतला जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार बठकीत सांगितले. ऊस दर जाहीर करण्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा संघटनेचा मानस असून हिंसात्मक आंदोलनाचे आपण समर्थन करणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रविकांत तुपकर, महेश खराडे, संदीप राजोबा आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षी राज्यात १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते, यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसामुळे यामध्ये घट येणार असून यावर्षी ५० ते ५५ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले ,की देशांतर्गत साखर उत्पादन २४५ लाख टनाचे असून यावर्षी २६० लाख टनापर्यंत उत्पादन होईल असा कयास आहे. गेल्यावर्षी विक्रमी म्हणजे ३२१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या वर्षी गरजेइतके साखर उत्पादन होणार असून याचा फायदा ऊस उत्पादकांना व्हायला हवा. यासाठी केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्यास प्रतिबंध घातला तर देशांतर्गत उत्पादनाला चांगला दर मिळू शकतो.

कृषी मूल्य आयोगाच्या बठकीत उत्पादन खर्चाशी निगडित दराची मागणी करण्यात आली आहे. मात्र गेली दोन वर्षे एफआरपीबाबत केंद्र सरकारने ऊस उत्पादकांची फसवणूक केली असून एफआरपी निश्चित करीत असताना साडेनऊची रिकव्हरी वाढवून दहा करण्यात आल्याने उत्पादकांचेच नुकसान झाले. यंदाची नैसर्गिक आपत्तीची स्थिती लक्षात घेऊन दर जाहीर करावेत अशी आमची भूमिका आहे. याबाबत काय भूमिका घ्यायची, आंदोलनाची दिशा कोणती हवी याबाबतचा निर्णय जयसिंगपूर येथे शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या १८ व्या ऊस परिषदेत घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकची सीमाबंद गैरलागू

कर्नाटक शासनाने ऊस परराज्यात पाठविण्यास बंदी घातली आहे याकडे लक्ष वेधले असता शेट्टी म्हणाले, की जेथे दर जादा मिळेल तिकडे ऊस देण्याचा शेतकऱ्यांचा हक्क असून कर्नाटकचा कायदा झुगारून आपण ऊस देणार आहोत. कारखाने सुरू राहण्यासाठी अशा पद्धतीचा दांभिकपणा संघटना कधीही सहन करणार नाही.

हिंसेचे समर्थन नाही

ऊस दरासाठीचे आंदोलन शांततेच्या मार्गानेच व्हावे अशी आमची भूमिका असून हिंसात्मक आंदोलनाचे कधीही समर्थन करणार नाही, असे सांगत राजू शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्याला उचकवण्याचे काम काही मंडळी करीत असतील तर तेही चुकीचेच आहे. न्याय्य हक्कासाठी जिकिरीला आल्यावर असे प्रकार घडत असतील तर त्याला व्यवस्थाही तितकीच जबाबदार ठरते.