प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

लोकसभा निवडणूक सोलापूर येथून लढण्यासह काँग्रेससोबतच्या आघाडीची भूमिका उद्या मंगळवारी मुंबई येथे जाहीर करू, असे  भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  सांगितले.

अकोल्यातील यशवंत निवासस्थानी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूर येथून लक्ष्मण माने यांनी माझी उमेदवारी जाहीर केली. तेथील कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकाच वेळी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढता येते. त्यामुळे सोलापूर येथून लढण्यासंदर्भातील निर्णयासह काँग्रेससोबतच्या आघाडीची भूमिका उद्या मुंबईत जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास राजकारणातील घराणेशाही संपून जाईल, असा दावाही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

हल्ल्याचे राजकारण

पुलवामा दहशतवादी हल्ला व पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर वासुसेनेकडून करण्यात आलेला हवाई हल्ला याचे भाजप व काँग्रेस राजकारण करीत आहेत. काँग्रेस म्हणते आमच्या काळात १२, तर भाजप तीन ‘एअर स्ट्राइक’ केल्याचा दावा करत आहे. मात्र, एकाव्यतिरिक्त इतर घटनेची जनतेला कल्पना नाही. त्यामुळे यात सत्यता असेल, तर भाजप व काँग्रेसने याचे पुरावे द्यावेत, असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.

पहिल्या टप्प्यातून तीन मतदारसंघ का वगळले?

भाजपला स्वतंत्र विदर्भ राज्य करायचे नाही, त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीप्रमाणे विदर्भातील १० मतदारसंघांतही पहिल्याच टप्प्यात निवडणूक घ्यायला हवी होती. पहिल्या टप्प्यातून अकोला, अमरावती व बुलढाणा का वगळण्यात आले, असा सवाल करून या संदर्भात आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.