खासदार राजू शेट्टी यांची माहिती

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिटय़ूशन क्लब येथे  किसान मुक्तीच्या दोन विधेयकावर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषदेत झाली. या दोन्ही विधयेकांस देशातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे,  अशी माहिती  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव, काँग्रेस लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खग्रे, मोहन प्रकाश, सीताराम येच्युरी, डॉ. फारूक अब्दुला, खासदार कनीमोळी, शिवसेनेचे खासदार डॉ. अरिवद सावंत, खासदार राजू शेट्टी, व्ही.एम.सिंग, यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते,असेही ते म्हणाले.

खासदार शेट्टी यांच्या प्रयत्नातून देशभरातून १९० पेक्षा अधिक शेतकरी संघटना  एकत्रित येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण देशभर यात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनजागृती देखील करण्यात आली होती. या समितीने संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये शेतकऱ्यांची  कर्जमुक्ती  आणि दीडपट हमीभाव अशी दोन खासगी विधेयके सादर होण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

समितीचे  संयोजक आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग यांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांमधून  आम्ही हे  विधेयक तयार केले आहे. सरकारने हे विधेयक  स्वीकारले  पाहिजे. विधेयकावर विस्तृत चर्चा करण्यासाठी एक समिती गठित केली असून खासदार शेट्टी, व्ही.एम. सिंग, कविता कुरबट्टी, किरण मिसाळ, आशिष मिसाळ हे शेतकरी संघटनांच्यावतीने प्रतिनिधी असणार आहेत. तसेच खासदार शरद पवार व शरद यादव यांच्याकडून  ६ प्रतिनिधी नेमले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे,  अशी मागणी त्यांनी केली. त्याला सर्वानी एकमुखाने पाठिंबा दिला.  तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढाई करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.

याबाबत  खासदार  शेट्टी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांनी बनविलेले ही विधेयके आहेत. मी फक्त ते  संसदेत  सादर करीत आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने समितीचे विधेयक लोकसभेत शेट्टी तर राज्यसभेत के.के राजीव हे मांडणार  आहेत.