राखी चव्हाण, नागपूर

पांढरकवडा टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर गुंता सुटेल, असे वाटत असतानाच संशयाचे जाळे अधिक वाढत आहे. या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच नव्हे, तर भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या नियमांचेही उल्लंघन झाले आहे. त्यामुळे प्राधिकरणासह परिषदही पुरावे गोळा करत असून, गुन्हा दाखल करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

वाघिणीला ठार मारण्यात आले तेव्हा नवाब शफात अली खानचा मुलगा असगर आणि वनरक्षक मुखबीर शेख तसेच चार वनरक्षक त्यांच्यासोबत होते. मुखबीरने डार्ट मारल्यानंतर वाघिणीने चमूच्या दिशेने हल्ला केल्यामुळे गोळी झाडण्यात आली, असा दावा वनखात्याने केला आहे. प्राधिकरणाच्या नियमानुसार या चमूत पशुवैद्यक असावा लागतो. सहाय्यक वनसंरक्षकही असावा लागतो. मात्र, वाघिणीला ठार मारण्यात आले, तेव्हा यापैकी कुणीही नव्हते. भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या नियमानुसार बेशुद्ध करण्याचे औषध हाताळण्याचा आणि वापरण्याचा अधिकार फक्त नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच आहे. मग, मुखबीरने डार्ट मारलाच कसा, अशा अनेक प्रश्नांचा गुंता वाढत चालला आहे. घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या पंचनाम्यात वाघिणीला कुणी मारले, कोण उपस्थित होते, याचाही उल्लेख नाही. पशुवैद्यक नसल्याचे प्रकरण अंगावर येईल म्हणून उपस्थित पशुवैद्यकांवर त्या ठिकाणी सही करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पण, पशुवैद्यकांनी सही करण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणातील गोंधळ वाढतच आहे. फॉरेन्सिक आणि बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या निर्देशानुसार वाघिणीच्या शवविच्छेदनादरम्यान नमुने घेऊन ते सील करण्यात आले आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालानंतरच काय ते कळणार आहे. प्राधिकरण आणि परिषद या प्रकरणातील पुराव्यांचा शोध घेत असून ते हाती आल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

प्रकरण न्यायालयात?

भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलम ३० नुसार प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे औषध फक्त परिषदेतील नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच बाळगता आणि वापरता येते. कारण ते शेडय़ुल एचमध्ये येते. याव्यतिरिक्त कुणी ते बाळगत आणि वापरत असेल तर तो अदखलपात्र गुन्हा ठरतो. कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे परिषद चौकशी समिती स्थापन करते. परिषदेच्या कायद्यानुसार  इतरांना असे औषध बाळगणे बेकायदशीर आहे, गुन्हा आहे. न्यायालयात ते प्रकरण दाखल होते, अशी माहिती पशुवैद्यक डॉ. बेदरकर यांनी दिली.

संशयास्पद काय?

’ डार्ट मारल्यानंतर कातडीवर लालसर डाग येतो, तो येथे कुठेही नव्हता. डार्ट बंदुकीने मारला असेल तर तो मांसामध्ये आत घुसायला हवा होता, पण हा डार्ट वर आणि आडव्या दिशेने होता.

’ बंदुकीची गोळी वाघिणीच्या डाव्या खांद्याच्या बाजूने आत गेली. डाव्या आणि उजव्या बाजूच्या फुफ्फुसातून श्वासनलिकेला लागून उजव्या बाजूच्या खांद्याला अडकली. यावरून गोळी अतिशय जवळून आणि पायी असताना मारल्याचा दाट संशय आहे.

’ डार्टिगच्या सुईच्या बाजूला छिद्र असते. त्यावर रबराची स्लीव लावली जाते. सुई मांसात घुसल्यानंतर रबर मागे येतो आणि सुईचे छिद्र उघडून सिरीनमध्ये असलेले औषध आत जाते. याबाबत टी-१च्या अंगावर असलेल्या डार्टमध्ये सारेच संशयास्पद आहे.

फॉरेन्सिक, बॅलेस्टिक तज्ज्ञानुसार अशा प्रकरणांमध्ये बंदुकीची गोळी जिथे लागली, त्याठिकाणच्या मांसाचा तुकडा जमा केला जातो त्यावरून ज्या बंदुकीतून गोळी घालण्यात आली ती बंदूक कोणती याची माहिती मिळते. तसेच किती फुटांवरून गोळी झाडली, हेसुध्दा स्पष्ट होते. फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तो मांसाचा तुकडा नेताना हा तुकडा खरडय़ावर ठेवून त्याच्या चारही कॉर्नरला शिवले जाते. म्हणजे प्रयोगशाळेत नेईपर्यंत हा मांसाचा तुकडा जसाच्या तसा राहतो.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्राधिकरणाच्या नियमानुसार त्या ठिकाणी पशुवैद्यक नव्हता. फॉरेन्सिक अहवालाची आम्ही वाट बघत आहोत. हा अहवाल आल्यानंतर आम्ही मुख्यालयाला आमचा अहवाल पाठवू. मुख्यालयातून आदेश आल्यानंतर पुढची कारवाई करू.

हेमंत कामडी, साहाय्यक (  महासंचालक, राष्ट्रीय व्याघ्र  संवर्धन प्राधिकरण)

वाघिणीला ठार करण्यात आले तेव्हा तिला जेरबंद करण्यासाठी नेमण्यात आलेला चमू तिथे नव्हता तर पेट्रोलिंगचा चमू होता. त्यामुळे या चमूत पशुवैद्यक नव्हता हे खरे आहे.

      – पंचभाई, विभागीय वनाधिकारी