भारतीय रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांच्या जीविताला धोका झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री राम शिंदे व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीची तक्रार पक्षाचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. आठवले यांना संरक्षण पुरवण्यात सरकार कुचराई करत असल्याने त्यांच्या जीविताला नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखाच धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यात दलितांचे शिरकाण केले जात आहे. गेल्या दोन वर्षांत तर दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढच झाली आहे. समतावाद्यांवर हल्ले करून त्यांचे खून पाडले जात आहेत. आठवले हे अत्याचाराच्या घटनांत पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रत्येक ठिकाणी धावून जातात. दलितांना आधार देताना दुसऱ्या बाजूने आठवले यांच्याविरुद्ध निर्माण होणाऱ्या व्यक्तिगत द्वेषातून हल्ले होऊ शकतात. याचीच दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारने आठवले यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
सरकार अनेकांना केवळ प्रसिद्धीसाठी संरक्षण पुरवते, मात्र आठवले यांच्याबाबत काही घटना घडल्यावर सरकार त्याची दखल घेणार का, असाही प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. सध्या आठवले यांच्यासमवेत एक पोलीस शिपाई असतो. त्यांच्या घरी पोलीस बंदोबस्त असतो व मुंबईत फिरताना समवेत एक पोलीस गाडी असते. मात्र आठवले यांना मुंबईतील रमाबाई आंबेडकर वसाहतीत झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. ती दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युतीला पाठिंबा देण्याची भूमिका आठवले यांनी घेतल्यानंतर त्या वेळच्या आघाडी सरकारने ही सुरक्षाव्यवस्था काढून घेतली, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते अजय साळवे, नाना पाटोळे, सुजित घंगाळे, रमेश हिवाळे, विवेक विधाते आदी उपस्थित होते.
‘अन्यथा रस्त्यावर उतरू’
रामदास आठवले यांच्या सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी सरकारची असल्याने त्यांना पुरेशी सुरक्षा द्यावी, या मागणीसाठी पुढील आठवडय़ात पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तरीही दखल न घेतल्यास आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा अशोक गायकवाड यांनी दिला. आठवले यांच्या सुरक्षेसाठी आरपीआयचे कार्यकर्तेही पुढाकार घेतील. त्यासाठी सरकारने या कार्यकर्त्यांना शस्त्रे पुरवावीत, अशीही मागणी त्यांनी केली.