रामटेक लोकसभा मतदारसंघावरही रिपाइंने (आठवले) शड्डू ठोकला असून उद्या रामटेकला होणाऱ्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडे असलेल्या या मतदार संघावरील रिपाइंच्या दाव्याने महायुतीत मात्र चुळबुळ सुरू झाली आहे.
लोकसभेच्या राज्यातील एकूण जागांपैकी माढासह काही मतदार संघ रिपाइंने मागितले होते. मात्र, आता रामटेक लोकसभा मतदार संघावरही दावा केला आहे. युतीच्या जागा वाटपात गेली दोन-तीन दशके हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. १९५७ ते १९९८ पर्यंत येथून सतत काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव येथून दोनदा निवडून आले होते. १९९९ व २००४ असे दोनदा शिवसेनेचे सुबोध मोहिते व त्यांच्या राजीनाम्याने २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश जाधव निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसचे मुकूल वासनिक यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. या मतदारसंघात दलित मतांची संख्या लक्षणीय असून एकगठ्ठा मतदान झाल्यास एखाद्या उमेदवारास तारू शकतात किंवा एखादा उमेदवाराचा पराभवही होऊ शकतो.
भाजप-शिवसेना युतीत ही जागा १९९९ पासून शिवसेनेकडे आहे. त्यातच यंदा प्रथमच रिपाइं युतीत सामील झाली. या महायुतीत सामील होताच लक्षणीय दलित मतदारसंख्येच्या बळावर आठवले गटाने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. नुसता दावा करून हा पक्ष थांबलेला नसून तेथे बूथ कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारण्यात आली आहे. रामटेक लोकसभा मतदार संघातील पारशिवनी, काटोल, सावनेर, हिंगणा, कामठी, बुटीबोरी, मोहपा, उमरेड या तालुक्यांमध्ये बैठकांना जोर आला आहे. मतदार संघातील बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या, २१ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता रामटेकमधील शांती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव आर. एस. वानखेडे, प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांमध्ये दलित मतांची संख्या निर्णायक असल्याने किमान रामटेक मतदार संघ वाटय़ाला यावा, असे कार्यकर्त्यांना वाटते. मिळणारा प्रतिसाद व कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या सांसदीय मंडळाचे राजन वाघमारे, राजू बहादुरे, आर. एस. वानखेडे, दुर्वास चौधरी, एल. के. मडावी हे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन रामटेक मतदार संघात महायुतीकडून रिपाइंचा उमेदवार उभा करण्यासंबंधी आग्रह धरणार आहेत. रामटेक मतदार संघावर रिपाइंने केलेला दावा पाहता महायुतीत विशेषत: शिवसेनेत खळबळ उडाली नाही तरच नवल. शिवशक्ती व भीमशक्तीचा नारा देणाऱ्या शिवसेनेची यावर काय प्रतिक्रिया राहील, हे येणारा काळच सांगेल.

दरम्यान, ही जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिपाइंच्या मागणीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितले.