जामखेड तालुक्यातील खर्डा येथे नितीन राजू आगे याची जी हत्या झाली, त्या क्रूर हत्येचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. रिपब्लिकन पक्षाने मराठा समाजाबद्दल जातीचे राजकारण कधीच केलेले नाही. ज्यांनी नितीनला हालहाल करून मारले, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध आम्ही आवाज उठवला असून, त्यात कोणत्याही समाजाला लक्ष्य केलेले नाही, असे भारिपचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी स्पष्ट केले आहे.
साळेव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की खडर्य़ात घडलेली घटना निंदनीय असून रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) नितीन आगेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी त्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला कोणताही जातीय रंग दिलेला नाही, त्यामुळे यात कोणीही दलित-सवर्ण असा समज करू नये असे आवाहन साळवे यांनी केले आहे.
 गुन्हेगाराला जात नसते. खर्डा गावात दलित-सवर्ण हा वादही नाही. प्रेमासारख्या संवेदनशील प्रकरणातून हे प्रकरण घडले असून जे आरोपी आहेत त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी ही शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीचीच नव्हेतर तमाम बहुजनांची मागणी आहे. यामध्ये विनाकारण कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. पोलिसांच्या कामाबाबत आम्ही समाधानी आहोत. पोलिसांच्या कामात कोणी हस्तक्षेप करत नाही त्यामुळे मराठा समाजाने विनाकारण आमच्यावर चिखलफेक होते असे समजू नये. घडलेली घटना दलित-सवर्ण वाद नसला तरी घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. गुन्हेगाराला सजा व्हायलाच हवी. त्यासाठीच नेते, पुढारी, कार्यकर्ते, आगे कुटुंबाला भेटून त्यांच्या दु:खात सहभागी होत आहेत, हे मराठा समाजाने समजून घ्यावे असेही आवाहन साळवे यांनी केले आहे.