News Flash

काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर आता रिपाइं गवई गटाच्या अटी!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी संपुष्टात आल्यानंतर आता उभय पक्षांनी कधीकाळी जवळ असलेल्या गटांना हाताशी धरण्यास सुरुवात केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी रिपब्लिकन

| September 27, 2014 04:04 am

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी संपुष्टात आल्यानंतर आता उभय पक्षांनी कधीकाळी जवळ असलेल्या गटांना हाताशी धरण्यास सुरुवात केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी संपर्क साधून तडजोड करण्याची धडपड चालवली आहे. डॉ. गवई यांनी मात्र काही अटी समोर केल्या आहेत.
‘नवीन घडामोडीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही सातत्याने संपर्क केला जात आहे. त्यामुळे तूर्तास उर्वरित उमेदवारांच्या नावांची घोषणा आम्ही थांबवली आहे. आपण ‘महाशक्ती’च्या ७५ उमेदवारांना ए-बी फॉर्म दिले आहेत. ते परत घेतले जाणार नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा खेळ केला तसे आपण होऊ देणार नाही. तडजोड करायचीच असेल, तर ७५ जागांच्या पुढे करावी लागेल, असे आपण या नेत्यांना सांगितले आहे’, असे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.
रिपाइं गवई गटाने सुरुवातीला बसप आणि भारिप-बमसंशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, पण चर्चा निष्फळ ठरल्यानंतर रिपाइंने अवामी विकास पार्टी, मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, आझाद विदर्भ सेना, ओबीसी-एनटी पार्टी, रिपब्लिकन क्रांती दल या छोटय़ा पक्षांसोबत युती करून ‘महाशक्ती’ ही आघाडी स्थापन केली. लोकसभा निवडणुकीत डॉ. गवई हे भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले होते, पण विधानसभेत मात्र हे दोन्ही गट परस्परविरोधात आहेत. ‘महाशक्ती’ने सर्व २८८ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत ७५ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आता डॉ. गवईंनी ‘ए-बी फॉर्म’चे वाटप थांबवले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून कोणते प्रस्ताव येतात, याची त्यांना प्रतीक्षा आहे.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी रात्रभर फोन केले. पक्षनेतृत्वाने आपल्याशी थेट चर्चा करावी, पुढच्या प्रस्तावांवर विचार होऊ शकतो, असे आपण त्यांना सांगितले. काहींनी तर आपल्या मतदारसंघात ‘महाशक्ती’ने उमेदवार उभा करू नये, अशी विनंती केली. आपल्यासाठी कार्यकर्ते सर्वतोपरी असून त्यांच्यासोबत अन्याय होऊ देणार नाही’, असे डॉ. गवईंचे म्हणणे होते.
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्रिशंकू स्थिती येईल आणि वर्षभरानंतर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील, असे भाकितही डॉ. गवई यांनी वर्तवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र गवई यांनी ‘रिडालोस’मधून बाहेर पडून काँग्रेसला पाठिंबा दिला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्यासोबत चर्चाही टाळल्याने ते संतापले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 4:04 am

Web Title: rpi gavai group keep demands to congress ncp
Next Stories
1 दुर्लक्षामुळे विदर्भातील पर्यटनस्थळे विकासाविना
2 सांगलीत आघाडीतील समीकरणे बिघडली
3 भाजपत इच्छुकांची धांदल
Just Now!
X