पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आर्थिक मदत जाहीर केली. या दोन शहीद जवानांच्या कुटुंबियाना प्रत्येकी 10 लाख रुपये असे 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी जाहीर केले. परिणामी, शिर्डी, सिद्धिविनायक पाठोपाठ आता पंढरपुरची विठ्ठल माउली देखील जवानांच्या पाठीमागे उभी राहिली आहे.

नुकतेच पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 40 जवान शहीद झाले. यामध्ये राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संज्सिंह राजपूत हे जवान शहीद झाले . त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी ,कर्मचारी आणि तमाम विठ्ठलभक्त आणि वारकरी सहभागी झाले आहेत. या शहीद जवानाच्या कुटुंबियाना प्रत्येकी १० लाख असे एकूण २० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या योग्य निर्देशानुसार हा निधी शहिदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.भोसले यांनी दिली.

यापुर्वीही मंदिर समितीने राज्यातील दुष्काळ परिस्थितीत किंवा केरळमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली होती.