नाशिकसह देशभरातून लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव कमालीचे घसरले असले तरी त्यावर चोरटय़ांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कळवणहून उत्तरप्रदेशला पाठविलेला तब्बल १० लाख रुपयांचा कांदा चोरटय़ांनी लंपास केला. या प्रकरणी कांदा व्यापाऱ्याने वाहतुकदाराविरोधात तक्रार दिली आहे.
११ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडल्याची तक्रार कळवण येथील कांदा व्यापारी महाजन यांची पत्नी अनिता महाजन यांनी दिली. महाजन हे कांदा व्यापारी असून त्यांनी १९४ क्विंटल कांदा उत्तरप्रदेशच्या बाजारात पाठविला होता. साधारणत: तीन दिवसांत हा कांदा उपरोक्त ठिकाणी पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, तो पोहोचला नाही. मालमोटार चालकाने त्याची मध्येच विल्हेवाट लावली. याची माहिती समजल्यानंतर या प्रकरणी तक्रार देण्यात आली. यावरून कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी गगनाला भिडलेले कांद्याचे भाव सध्या कमी होत आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी ८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला प्रति क्विंटलला ३०५० रुपये भाव मिळाला.