हिंसक कारवायांच्या माध्यमातून देशातील अनेक राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या नक्षलवाद्यांचा म्होरक्या गणपतीवरील बक्षीसांची रक्कम आता दोन कोटी ६७ लाखांवर गेली आहे. जंगलात राहून सशस्त्र चळवळ संचालित करणारा हा जहाल नक्षलवादी आता देशातील ‘मोस्ट वॉण्टेड’ नक्षलवादी ठरला आहे.
आधी पीपल्स वॉर ग्रुप व आता भाकप माओवादी या संघटनेच्या माध्यमातून नक्षलवाद्यांचा सशस्त्र लढा गेल्या तीन दशकांपासून देशात सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात आजवर पोलिसांसह शेकडो नागरिक ठार झाले आहेत. या हिंसक चळवळीचे नेतृत्व आरंभापासून मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपतीकडे आहे. आंध्रप्रदेशातील करीमनगर जिल्ह्य़ातील बीरपूरचा राहणारा गणपती हा उच्चशिक्षित आहे. सध्या मध्यभारतातील अबुजमाड पहाडावरील जंगलात आश्रय घेऊन असलेल्या ६७ वर्षांच्या गणपतीला पकडण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यांनी बक्षीसे घोषित केली आहेत. नुकतेच महाराष्ट्र सरकारने गणपतीला पकडून देणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. नक्षलवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया असलेल्या छत्तीसगड सरकारनेसुद्धा गणपतीवर एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय, राष्ट्रीय तपास संस्थेने गणपतीला पकडून देणाऱ्याला १५ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, तसेच आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या राज्यांनीसुद्धा गणपतीवर बक्षीसे जाहीर केली आहेत. या सर्व बक्षीसांची गोळाबेरीज आता दोन कोटी ६७ लाखावर जाऊन पोहोचली आहे. एवढी मोठी बक्षीसांची रक्कम शिरावर घेऊन जगणारा गणपती हा देशातला सर्वात महागडा ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगार ठरला आहे.  
 केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आठ हजार सशस्त्र नक्षलवादी आहेत. या नक्षलवाद्यांचे नेतृत्त्व गणपतीकडे आहे. जंगलात राहूनसुद्धा तिहेरी सुरक्षा कवचात वावरणाऱ्या गणपतीपर्यंत पोहोचणे अजून तरी सुरक्षा दलांना जमलेले नाही. त्यामुळेच त्याच्यावरील बक्षीसात आता राज्यांनी घसघशीत वाढ केली आहे. याशिवाय, ही हिंसक चळवळ संचालित करणाऱ्या केंद्रीय समितीच्या सदस्यांवरसुद्धा प्रत्येक राज्यांनी एक एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. आधी ३९ सदस्य असलेली ही समिती आता १९ सदस्यांचीच झाली आहे. महाराष्ट्रातून या समितीवर मिलिंद तेलतुंबडे उर्फ  दीपकचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. गणपतीसह या सर्व जहाल नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दले व पोलिस जंगजंग पछाडत असले तरी अद्याप त्यात कुणाला यश आले नाही.