रायगड जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २४३ कोटी ३८ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ाअंतर्गत जिल्ह्य़ातील ५९ पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार असून, पहिल्या टप्प्यातील कामांसाठी जिल्ह्य़ाला ५७ कोटींचा निधी लागणार आहे.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात पर्यटन विकासाला खूप वाव आहे. मात्र नियोजन आणि निधी यांची सांगड घालता आली नसल्याने कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फारसा विकास झालेला नाही. कोकणातील पर्यटनला चालना द्यायची असेल तर पर्यटन केंद्रावर पायाभूत सुविधा विकास करणे आणि पर्यटन उद्योगाला असलेले विस्कळीत स्वरूप दूर करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आता रायगड जिल्ह्य़ासाठी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्य़ातील ५९ पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध विकास केला जाणार आहे.
 हा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुण्याच्या कन्सल्टंट इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेकडून जिल्ह्य़ातील ५९ पर्यटन केंद्राचे सर्वेक्षण करण्यात आले. स्थानिकांच्या तसेच पर्यटन उद्योगातील व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कुठल्या सोयी-सुविधांची गरज आहे आणि कुठल्या गावात कोणत्या नावीन्यपूर्ण योजना राबविता येतील याचा आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी, सार्वजनिक शौचालय, समुद्र किनाऱ्यांवर, सार्वजनिक स्नानगृह, वॉट टॉवर, पार्किंग, प्रवासी साह्य़ता केंद्र, म्युझियम्स, लाइट आणि साऊंड शो, फूड स्टॉल यासारख्या पायाभूत सुविधांचा करण्यात आला आहे.
जवळपास २४३ कोटींच्या या पर्यटन विकास आराखडय़ात रायगड किल्ल्यासह, शिवथरघळ, चवदार तळे, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन केंद्राचा विकास केला जाणार आहे. यात प्रामुख्याने अलिबाग समुद्रकिनारा येथे लेझर शो, लाइट आणि साऊंड शो, मरीन पार्क, मत्सालय, कोकण हाट आणि आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शन यासारख्या सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहे. तर माथेरान येथेही ३८ पर्यटनस्थळांच्या विकासासोबतच म्युझिकल फाऊंटन, लेझर शो, सारख्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याशिवाय महाड येथील चवदार तळ्याचे सुशोभीकरण, म्युझिकल फाऊंटन सुविधा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर फणसाड अभयारण्यात जीप सफारी आणि टेहळणी मचाण उभारणी आणि टेंट सुविधा पुरवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विकास आराखडय़ातील सर्व कामांची अंमलबजावणी ही जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या आधिपत्याखाली केली जाणार आहे.
 जिल्हा प्रशासनाने तयार केलेला २४३ कोटींचा हा पर्यटन विकास आराखडा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी जवळपास ५७ कोटींचा निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याला मान्यता मिळून निधी प्राप्त होऊन अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली.
हर्षद कशाळकर, अलिबाग