26 February 2020

News Flash

राज्यभरातून २६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

सर्वाधिक भेसळयुक्त खवा नाशिक (८७७ किलो) आणि नागपूरमध्ये (६४४ किलो) आढळला आहे.

संग्रहित छायाचित्र

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : दिवाळीत मिठाई किंवा खवा, मावा खाल्ल्यानंतर घसा खवखवत असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. यंदा दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त खवा, मावा, मिठाई, तेल, तुपासह इतर पदार्थ बाजारात दाखल झाले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या दिवसात राज्यभरातून जवळपास ३ कोटी रुपयांचा खवा किंवा मावा, ४ कोटी रुपयांची मिठाई, ११ कोटी रुपयांचे तेल, वनस्पती, तूप आणि ६ कोटी रुपयांचे इतर भेसळयुक्त अन्नपदार्थ प्रशासनाने जप्त केले आहेत.

राज्यातून १ हजार ९५८ किलो भेसळयुक्त खवा किंवा मावा प्रशासनाने जप्त केला असून ११६ नमुने गोळा केले आहेत. सर्वाधिक भेसळयुक्त खवा नाशिक (८७७ किलो) आणि नागपूरमध्ये (६४४ किलो) आढळला आहे.  ३ हजार किलो भेसळयुक्तमिठाई प्रशासनाने ताब्यात घेतली असून यात अमरावती (१,३७६ किलो) आणि ठाणे(१,४२८ किलो) भागात अधिक प्रमाणात सापडली आहे. या मोहिमेमध्ये जवळपास वीस हजार किलो तेल, तूप, वनस्पती जप्त करण्यात आले आहे. पुण्यात सर्वाधिक (१२ हजार ०२१ किलो) आणि त्याखालोखाल नागपूरमधून (७,९२० किलो) भेसळयुक्त तूप, तेल आढळले. १ हजार ४५८ किलो इतर भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले.  मुंबईत मात्र कोणतेही पदार्थ भेसळयुक्त आढळलेले नाहीत, असे  आकडेवारीत नमूद  आहे. राज्यभरातून  २६ कोटी ३५ हजार रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ   जप्त झाले असून खवा(११६), मिठाई (३८५), तेल-तूप (३५१) आणि इतर अन्नपदार्थाचे (४७४) नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

मुंबईत निवडणुकांमुळे तपासणी मोहीम बारगळली

दरवर्षी मुंबईत सर्वाधिक तपासणी मोहीम राबविली जाते, परंतु यावर्षी मुंबई विभागातील ४९ कर्मचाऱ्यांपैकी ४७ कर्मचाऱ्यांसह साहाय्यक आयुक्त सर्वजण निवडणुकांच्या कामामध्ये व्यग्र असल्याने मुंबईत मोठय़ा प्रमाणात तपासणी मोहीम राबविणे शक्य झालेले नाही. अद्याप कर्मचारी निवडणुकांच्या कामातच अडकलेले आहेत. त्यामुळे मुंबईतून भेसळयुक्त पदार्थ न आढळल्याचे आकडेवारीमध्ये दिसत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले.

First Published on November 2, 2019 1:20 am

Web Title: rs 26 crore worth of adulterated food items seized across maharashtra
Next Stories
1 पालघरमध्ये काळ्या तिळाला सोन्याचे दिवस
2 अवकाळीने पिकांची वाताहत
3 वसईच्या किल्ल्यातील गार्सिया चर्चची दुरवस्था
Just Now!
X