मंदार लोहोकरे

पाच कोटींचा धनादेश प्रतीकात्मकच; दीड कोटींची यात्रा मदत दोन वर्षांपासून रखडली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या वतीने आषाढी वारीत पंढरपूर पालिकेसाठी म्हणून जाहीर केलेला पाच कोटींचा निधी कार्तिकी यात्रेचा दिवस उजाडला तरी पालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले दीड कोटींचे यात्रा अनुदान पालिकेला अद्याप मिळालेले नाही. एकूणच विठ्ठलाच्या द्वारी केलेल्या आर्थिक मदतीच्या घोषणा निव्वळ प्रतीकात्मक ठरल्या आहेत.

पंढरपूर येथे भरणाऱ्या चार मुख्य यात्रांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी आषाढी यात्रेला अनुदान दिले जाते. राज्यात सत्तांतर झाल्यावर यंदाच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही आषाढी वारी प्रतीकात्मक झाली तरी या वेळी झालेल्या छोटेखानी समारंभात मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षा साधना भोसले यांना यात्रा अनुदानाचा ५ कोटी रुपयांचा प्रतीकात्मक धनादेश देऊन उर्वरित प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. हा प्रतीकात्मक धनादेश मिळाल्याच्या घटनेला चार महिने उलटून गेले. आता कार्तिकी यात्रेचा दिवस (दि. २६ नोव्हेंबर) आला. या मधल्या काळात सरकारदरबारी पालिकेच्या वतीने शासनाशी अनेकदा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून या मदतीचे स्मरणही देऊन झाले. मात्र कागदावरचा हा धनादेश प्रत्यक्ष पालिकेच्या तिजोरीत जमा झाला नसल्याचे नगराध्यक्षा भोसले यांनी सांगितले. या काळात करोनाचा संसर्ग, टाळेबंदीने या तीर्थक्षेत्राचे अर्थशास्त्र पुरते कोलमडले. यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली आहे.

दरम्यान, कार्तिकी एकादशी २६ नोव्हेंबर रोजी आहे. या वेळी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. आता पवारांनी अर्थमंत्री या नात्याने अनुदानाची थकीत रक्कम द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

स्थिती बिकट..

शहरातील व्यापार, व्यवसाय थंड झाल्याने पालिकेला विविध करांमधून मिळणारे उत्पन्नही मिळेनासे झाले. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. शहरातील विकासकामे करणेही त्यांना अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून येणारे हे अनुदानही थकल्याने काम करणे अवघड झाल्याचे उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी सांगितले.

फडणवीस सरकारनेही..

दरम्यान पंढरपूर नगरपालिकेला मिळणारे हे यात्रा अनुदान ठाकरे सरकारपूर्वीच्या फडणवीस सरकारनेही थकवल्याचे उघड झाले आहे. ठाकरे यांच्या सरकारपूर्वीच्या आदल्या वर्षी फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या रकमेपैकी अद्याप दीड कोटींचे यात्रा अनुदान पालिकेला मिळालेले नाही.