जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाखाली बाधित पाच गावांमधील ४२६ खातेदारांना मंगळवारअखेर ७५ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६११ खातेदारांना भूसंपादनापोटी ५ कोटी रुपयांचा मोबदला अदा करण्यात आला आहे.
माडबन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर, डॉ. मिलिंद देसाई इत्यादींनी गेल्या महिन्यात राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कीरयांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर समझोत्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जैतापूर प्रकल्पग्रस्तांमध्ये फूट पडली असून, सानुग्रह अनुदान व संपादित जमिनीपोटी मोबदला स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमानींच्या सोईसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे राजापूरचे प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांनी नमूद केले.
जैतापूर प्रकल्पाखाली बाधित माडबन, निवेली, मीठगव्हाणे इत्यादी पाच गावांमध्ये मिळून एकूण दोन हजार ३३६ प्रकल्पग्रस्त आहेत.  
दरम्यान शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवानंतर जैतापूरला भेट देऊन प्रकल्पाच्या विरोधातील ग्रामस्थांचा मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबतही उत्सुकता आहे.