गुटखाबंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत तीन दिवसांत पाऊण कोटींचा गुटखा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गुटख्यासंबंधी कारवाईचे अधिकार असतानाही तिन्ही ठिकाणची कारवाई पोलिसांनीच केली.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळावर असलेल्या टपरीमालकाच्या गोदामावर बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी १४० पोते गुटखा आढळून आला. यानंतर टपरीसमोरील पत्र्याच्या शेडमध्येही पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणी २० पोते असा एकूण १६० पोते गुटखा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी ५१ लाख ५४ हजार ४७५ रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटखामालक मात्र पसार झाले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील शाहूनगर भागात छापा टाकून पोलिसांनी १५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या पाठोपाठ बीडमधीलच झमझम कॉलनीतील गोदामावर छापा टाकून पाच लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गेल्या तीन दिवसांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुटखा माफियांवर कारवाईची मोहीम हाती घेत पाऊण कोटींचा माल जप्त केला.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करणे अपेक्षित आहे. परंतु पोलिसांकडूनच कारवाई होत आहे. गुटखा जप्त केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी त्या भागातील पोलीस ठाण्यात येण्यासही विलंब लावतात. पोलीस कारवाई करीत असताना त्यांना सहकार्य करण्याची भूमिकाही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेतली जात नाही.