14 July 2020

News Flash

तनपुरे कारखान्यात ९० कोटींचा गैरव्यवहार

तनपुरे कारखाना धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे तोटय़ात गेला. त्याची चौकशी सुरू आहे. आता धुमाळांसह त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे संचालक, त्यांना मदत करणारे अधिकारी

| June 25, 2015 03:35 am

राहुरी येथील डॉ. बाबुरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यात माजी अध्यक्ष रामदास धुमाळ यांच्या कारकीर्दीत सन २००८ ते २०१० या कालावधीत साखरविक्रीत झालेला घोटाळा व नियमबाह्य पद्धतीने दिलेला ऊसदर यामुळे ९० कोटींचा गैरप्रकार झाला असून, त्याला संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या रकमेची वसुली संबंधिताकडून का करू नये, अशा नोटिसा ४० जणांना देण्यात आल्या आहेत.
तनपुरे कारखाना धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे तोटय़ात गेला. त्याची चौकशी सुरू आहे. आता धुमाळांसह त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे संचालक, त्यांना मदत करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागे शुक्लकाष्ट लागले असून, त्यांना ९० कोटीच्या गैरव्यवहारास जबाबदार धरून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल का करू नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या वेळच्या संचालक मंडळात माजी खासदार प्रसाद तनपुरे, भारत ढोकणे व सुरेश वाबळे यांचादेखील समावेश होता. पण अनेक निर्णय घेताना त्यांची सभेस अनुपस्थिती होती. त्यामुळे ते या गैरकारभाराच्या चौकशीच्या जंजाळातून सुटले आहेत. या तिघांना मात्र जबाबदार धरण्यात न आल्याने नोटिसा बजावण्यात आलेल्या नाहीत.
तनपुरे कारखान्याचे सन २००८ ते २००९ व २००९ ते २०१० या कालावधीतील कारभाराचे लेखापरीक्षण लेखापरीक्षक पांडुरंग मोहोळकर यांनी केले होते. त्या वेळी संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उधारीवर साखर विक्री केली. त्यामध्ये संचालक व कर्मचारी मिळून ३९ जण दोषी आढळले होते. तसेच कारखान्याने नियमबाह्य पद्धतीने ऊसदर दिला होता. कारखाना हा नाबार्ड पॅकेजमध्ये आहे. मंत्री समितीच्या निर्णयानुसार ऊसदर देताना साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. त्या वेळी ऊसदराकरिता किमान आधारभूत किंमत लागू होती. पण कारखान्याने नियमबाह्य पद्धतीने ऊसदर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही व्यवहारात सुमारे ९० कोटींहून अधिक कारखान्याचे नुकसान झाले. त्यामुळे लेखापरीक्षक मोहळकर यांनी साखर आयुक्त व सहकार खात्याकडे अहवाल पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती. विशेष लेखापरीक्षक विलास सोनटे यांनी याप्रकरणी १९६०च्या सहकार अधिनियम ६१चे ७२(३) नुसार कारवाई सुरू केली आहे. आता गैरव्यवहाराच्या या रकमेची जबाबदारी संबंधित संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकली जाणार असून, रकमेची वसुली संबंधितांकडून का करू नये, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ, सुभाष पाटील, रावसाहेब साबळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, सोपान म्हसे, तत्कालीन कार्यकारी संचालक बी. बी. पवार, हिशोब तपासनीस द्वारकानाथ डेंगळे, मोरे यांच्यासह अनेकांना मंगळवारी बजावण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. १४ जुलै रोजी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. तनपुरे कारखान्यावर सध्या प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे हे काम पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2015 3:35 am

Web Title: rs 90 crore fraud in tanapure sugar factory
टॅग Fraud,Shrirampur
Next Stories
1 कृष्णा’तील धक्कादायक निकालाची परंपरा कायम
2 अकोल्याचा पश्चिम भाग गारठला
3 नेदरलँडचे फुटबॉलपटू रॉन व्लार यांच्या भेटीने कोळवाडी हरखली
Just Now!
X