महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा हिस्सा वाढावा, या साठी महादेव जानकर यांची मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ात प्रत्येकी १ जागा लढविण्याची तयारी सुरू आहे. पैठण मतदारसंघात त्यांनी गुरुवारी दौरा केला आणि सभाही घेतल्या. नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड व पैठण येथील सभांना ते हेलिकॉप्टरने आले. जागावाटपात हिस्सा वाढावा, या साठी आघाडीतील घटक पक्ष प्रयत्न करीत आहेत.
घटक पक्षातील राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना धरून ठेवणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. समन्वयाची ती जबाबदारी पार पाडणारा नेता महायुतीत नसल्याने लहान घटक पक्षांची अडचण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पैठणच्या जागेवर दावा केला जात आहे. प्रल्हाद राठोड यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. मात्र, ही जागा शिवसेनेच्या कोटय़ात असल्याने देता येणार नाही, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी नुकतेच स्पष्ट केले. राठोड यांना कसे शांत करता येईल, याची रणनीतीही ते जाहीर सांगत आहेत, तरीही जानकर यांनी पैठणला मेळावा घेतला.
मुखेडमध्ये सभा घेतल्यानंतर ते पैठणला आले. या वेळी ‘लोकसत्ता’ शी बोलताना ते म्हणाले की, मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्य़ातून किमान १ जागा मिळावी, असे अपेक्षित आहे. मुखेड, कळमनुरी, गंगाखेड, घनसावंगी, परंडा, अहमदपूर, पैठण, औरंगाबाद पूर्व येथील जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाने दावा सांगितला आहे. महायुतीतील नेत्यांसमवेत चर्चा सुरू असली, तरी प्रत्येक जिल्ह्य़ात पक्षाच्या कार्यकर्त्यांला बळ दिले जात आहे. मराठवाडय़ात अधिक जागा मिळतील, असे ते म्हणाले.
शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनीही १५ जागांवर दावा सांगितला आहे. मात्र, त्यांना दोन किंवा तीन जागा दिल्या जातील, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. जागा वाढून मिळाव्यात, या साठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. लवकरच निर्णय होईल, असे मेटे म्हणाले.