..तर नितीन गडकरी पंतप्रधान होतील

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे. मोदींचा मनमानी कारभार संघाला पटत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यास एनडीएचे पुढील पंतप्रधान नितीन गडकरी राहतील, असे भाकित गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले.

अकोल्यातील स्वराज्य भवनच्या मैदानावर शुक्रवारी रात्री आयोजित शेतकरी व बेरोजगार युवकांच्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे, युवा नेते संग्राम गावंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मेळाव्यासाठी विदर्भ यूथ फोरमने पुढाकार घेतला होता.

शेतकरी आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवरून हार्दिक पटेल यांनी भाजपवर शरसंधान साधले. सर्व पक्षांनी शेतकऱ्यांना लाचार ठेवण्याचे षडयंत्र रचले आहे. काँग्रेस व भाजप हे सत्तेत आणि विरोधात असताना एकमेकांवर टीका करतात. दोन्ही पक्ष सारखे असून, शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय करीत नाहीत. भाजपने खोटी आश्वासने देऊन देशात बेरोजगारी वाढवली आहे, असा आरोप त्यांनी केला. आपले कोणत्याच राजकीय पक्षाशी देणे-घेणे नसल्याचे स्पष्टीकरणही हार्दिक पटेल यांनी दिले. शेतकरी व युवकांनी जागृत राहून लढा उभारणे गरजेचे आहे. तुम्ही साथ द्या, मी लढण्यासाठी तयार आहे, अशा शब्दात पटेल यांनी शेतकरी व युवकांना आश्वस्त केले. पंतप्रधान पदासाठी गडकरींच्या नावाला संघाची पसंती असून, त्यासाठी संघ प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी हार्दिक पटेल यांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व संघाच्या कार्यपद्धतीवर चौफेर टीका केली. शेतकरी व बेरोजगार युवक, युवतींच्या एल्गार मेळाव्यात तरुणाईचा उदंड प्रतिसाद लाभला.