भाजपचे  अध्यक्ष अमित शाह नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची शनिवारी भेट घेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहकुटुंब व्याघ्रभ्रमंतीचा आनंद घेतला. त्यांची ही व्याघ्रभ्रमंती सहकुटुंब आत्मचिंतनाचाच एक भाग होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजकीय वातावरणापासून थोडे दूर कुटुंबीयांसोबत निवांत राहण्यासाठी म्हणून गडकरी ५ ते ७ मार्च असे तीन दिवस ताडोबात मुक्कामाला होते. दरवर्षी ताडोबा प्रकल्प होळीत बंद असतो. मात्र, या वर्षी प्रथमच हा प्रकल्प ऑनलाइन बुकिंग झालेल्या १५६ पर्यटकांसाठी खुला होता. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश होता. गडकरी संघाशी संबंधित व्यक्तीच्या रॉयल टायगर्स रिसोर्टमध्ये मुक्कामाला होते. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह नागपुरात होते. त्याच वेळी गडकरी ताडोबात होते. गडकरींना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात मोदी यांच्यासह अमित शाह यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे, भाजप व संघ पदाधिकाऱ्यांच्या आत्मचिंतन बैठका नेहमीच रॉयल टायगर्स रिसॉर्टमध्येच होतात, हे विशेष. आत्मचिंतनानंतर गडकरी काल सकाळी नागपूरला परतले.