महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याप्रकरणी दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी भिवंडी न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. या खटल्याप्रकरणी ते आज न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडणार आहेत.

मार्च २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. याप्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

मार्च २०१५ मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. अखेर नोव्हेंबर २०१६ मध्ये राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.

वाचा: काँग्रेसही आता बूथ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार

भिवंडीत सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राहुल गांधी बुधवारी नागपूरला रवाना होणार असून एचएमटी तांदळाच्या वाणाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. खोब्रागडे यांचे नुकतेच निधन झाले.